छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या सायकल चोरणारा ६० वर्षीय चोरटा अटकेत, १९ सायकल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:49 IST2025-07-31T17:44:15+5:302025-07-31T17:49:03+5:30
सायकल चोरी करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात; १.१६ लाखांच्या १९ सायकली जप्त

छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या सायकल चोरणारा ६० वर्षीय चोरटा अटकेत, १९ सायकल जप्त
छत्रपती संभाजीनगर: सिडको परिसरातील शाळकरी मुलांच्या सायकली चोरी करणाऱ्या एका ६० वर्षीय इसमास पोलिसांनी गुरुवारी रात्री मिसारवाडी येथे रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून १.१६ लाख रुपयांच्या १९ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
दि. २९ जुलै रोजी पूजा प्रधान (वय २९) यांनी आपल्या मुलाची सायकल घराबाहेरून चोरी झाल्याची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. दुसऱ्याच दिवशी, ३० जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीची सायकल विक्रीसाठी मिसारवाडीतील गल्लीत आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सदर ठिकाणी सापळा रचून २३.३० वाजता लक्ष्मण भिमराव गायके (वय ६०, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) या इसमास सायकलसह पकडले. चौकशीत त्याने सायकल चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्याच्याकडून एकूण १९ सायकली विविध ठिकाणांहून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर सायकली त्याने लपवून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी जप्त केल्या.
मुलांसाठी, पालकांसाठी इशारा
सदर आरोपी शाळकरी मुलांच्या सायकलीच चोरत असल्याचे स्पष्ट झाले आहे, कारण अनेक मुले सायकल लॉक न लावता त्या सार्वजनिक ठिकाणी उभ्या ठेवतात. त्यामुळे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे की, पालकांनी आपल्या मुलांना सायकल लॉक लावण्याची सवय लावावी जेणेकरून अशा चोरी टाळता येतील.
ही कारवाई पोलीस आयुक्त मा. प्रविण पवार, पो.उपआयुक्त मा. प्रशांत स्वामी व सहाय्यक पो.आयुक्त मा. सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे आणि त्यांच्या पथकातील पोलीस उप निरिक्षक अनिल नाणेकर , सफौ सुभाष शेवाळे, पोह मंगेश पवार, पोह प्रदिप दंडवते, पोअं विशाल सोनवणे, पोअं प्रदीप फरकाडे, पोअं सहदेव साबळे, पोअं अमोल अंभोरे यांनी केली.