देवगाव रंगारी : कन्नड तालुक्यातील देभेगाव येथील गायरानात शनिवारी रात्री अचानक आग लागून सहा घरे खाक झाली. या आगीत संसारोपयोगी व शेतीपयोगी साहित्यांची राखरांगोळी झाल्याने ७ लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, आगीमुळे घरातील गॅस सिलींडरचा स्फोट झाल्याने एकाचा मनगटापासून हात तुटून ५० फुटावर जाऊन पडल्याने या गंभीर जखमीस तातडीने औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. कन्नड येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी जीवितहानी टळली.देभेगाव येथील गायरान गट क्र. १२३ मधील कैलास तुळशीराम माळी यांच्या घराच्या मागील गंजीस सर्वप्रथम आग लागून त्यांच्या घराला आगीने वेढा घातला. घरातील गॅस सिलींडरचा स्फोट होऊन आग विझविण्यासाठी गेलेला गावातील तरुण कैलास रतन थोरात (३०) याचा उजवा हात मनगटापासून तुटला व ५० फुटावर जाऊन पडला. तसेच स्फोटामुळे कैलासच्या शरीरालाही गंभीर जखमा झाल्या. त्याला तातडीने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. यानंतर आगीने जवळच्या इतर घरांनाही वेढा घातला. कारभारी दशरथ सोनवणे यांच्या कांदा चाळीला आग लागून १०० क्विंटल कांदा जळाला. यात त्यांचे सव्वा लाखांचे नुकसान झाले तर गंगूबाई अशोक माळी यांचे छप्पर जळून ८६ हजार रुपयांचे नुकसान झाले. रामेश्वर अशोक माळी यांचेही छप्पर जळून ८० हजारांचे नुकसान झाले. सोमनाथ अशोक माळी यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून ७४ हजारांचे तर संतोष कारभारी बोडखे यांच्या चारा गंजीचे व ठिबकचे २ लाख २६ हजारांचे नुकसान झाले. कन्नड न.प.च्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविली.तहसील कार्यालयाकडून पंचनामे करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार शेख हारुण, तलाठी आर.आर. चव्हाण, बी.टी. घटे, दरेकर अप्पा, स.पो.नि. स्वप्ना शहापूरकर, एस.जी. गव्हाणे, चेळेकर, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांनी सहकार्य केले. आगीमुळे ही कुटुंबे संकटात सापडली असून शासनाने या कुटुंबांना तातडीने मदत करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
देभेगावात ६ घरांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:07 IST