छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५७ पाकिस्तानी नागरिकांचे लाँग टर्म व्हिसावर वास्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 19:37 IST2025-05-06T19:37:33+5:302025-05-06T19:37:48+5:30
लाँग टर्म व्हिसा म्हणजे काय? कोणाला मिळतो हा व्हिसा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५७ पाकिस्तानी नागरिकांचे लाँग टर्म व्हिसावर वास्तव्य
छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या ५७ पाकिस्तानी नागरिक वास्तव्य करीत आहेत. हे सर्व नागरिक प्रदीर्घ व्हिसावर वास्तव्यास आहेत. यातील अनेक जण वैवाहिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक कारणांतून पाकिस्तानातून आले आहेत. केंद्र सरकारकडून अद्याप या लाँग टर्म व्हिसाबाबत निर्णय न झाल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात सहभागी झालेले दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेनंतर भारत- पाकिस्तान संबंधांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला. त्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचा आदेश जारी केला. त्यानंतर जिल्हा पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांकडून प्रत्येकाच्या पार्श्वभूमीची चौकशी सुरू करण्यात आली. त्यांच्याकडील वैध कागदपत्रे, व्हिसाची मुदत, वास्तव्यास असल्याचे कारण, भारतातील संबंध यासंदर्भात सखोल तपास करण्यात येत आहे.
लाँग टर्म व्हिसा म्हणजे काय?
लाँग टर्म व्हिसा म्हणजे भारतात दीर्घकालीन वास्तव्यासाठी केंद्र शासनाची परवानगी मिळवली जाते. प्रामुख्याने पाकिस्तानातील हिंदू, शीख, ख्रिश्चन व बौद्ध अल्पसंख्याक यांना ही बाब लागू होते.
शहरात ५२ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य होते. २०२४ मध्ये त्यात वाढ होऊन तो आकडा ५७ पर्यंत पोहोचला. यात १७ मुस्लिम, तर ४० हिंदू नागरिक आहेत. त्यांची प्राथमिक चौकशी करून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यांच्याबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. याव्यतिरीक्त गेल्या काही महिन्यांमध्येदेखील एकही पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.