शासकीय रुग्णालय घाटीतील ‘पर्मनंट’ नोकरीकडे ५४ जणांची पाठ! 'वेटिंग'वाल्यांच्या आशापल्लवित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:41 IST2026-02-02T16:40:43+5:302026-02-02T16:41:23+5:30
कागदपत्र पडताळणीस गैरहजर उमेदवारांच्या जागी आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाईल.

शासकीय रुग्णालय घाटीतील ‘पर्मनंट’ नोकरीकडे ५४ जणांची पाठ! 'वेटिंग'वाल्यांच्या आशापल्लवित
छत्रपती संभाजीनगर : ‘पर्मनंट’ नोकरी मिळावी म्हणून आजच्या तरुणाईची धडपड पाहायला मिळते. परंतु घाटी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तब्बल ५४ उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे आता त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळणार आहे.
२९१ उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली आहे. घाटी रुग्णालयाची सुरुवात होताना म्हणजे १९५६ च्या कालावधीत सरळ सेवेने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली होती. त्यानंतर तब्बल ६९ वर्षांनंतर आता ही भरती प्रक्रिया होत आहे. गेला आठवडाभर परीक्षेतील गुणवत्ताधारक उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कागदपत्रे पडताळणी समितीचे अध्यक्ष डाॅ. एम. एस. बेग, नोडल अधिकारी डॉ. भारत सोनवणे, डाॅ. स्मिता अंदूरकर, डाॅ. विनोद मुंदडा, डाॅ. तपन जक्कल, डाॅ. सतीश बाहेकर, प्रशासकीय अधिकारी दिलीप गोधणे, शेख नईम आदींनी प्रक्रिया पार पाडली.
दुसरी नोकरी, इतर परीक्षा
दुसरी नोकरी मिळणे, इतर परीक्षेत यश मिळण्याची आशा यासह विविध कारणांनी ५४ उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीकडे पाठ फिरविल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एकास दोन उमेदवार
कागदपत्र पडताळणी झालेल्या उमेदवारांची आता आरक्षण, क्रीडा संदर्भातील प्रमाणपत्रांची पडताळणी, पोलिस छाननी होईल. कागदपत्र पडताळणीस गैरहजर उमेदवारांच्या जागी आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाईल. एका जागेसाठी प्रतीक्षा यादीतील दोन उमेदवारांना बोलाविण्यात येईल. महिनाभरानंतर ही प्रक्रिया होईल.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता