विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी ५ हजार ऑनलाईन अर्ज, पोस्टल अर्जाची मोजणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 19:52 IST2025-05-10T19:52:03+5:302025-05-10T19:52:58+5:30

विद्यापीठात प्राध्यापक भरतीसाठी मागविलेल्या अर्जामुळे एक खोलीच भरली आहे.

5,000 applications received online for 73 professor posts in the BAMU university, counting of postal applications begins | विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी ५ हजार ऑनलाईन अर्ज, पोस्टल अर्जाची मोजणी सुरू

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी ५ हजार ऑनलाईन अर्ज, पोस्टल अर्जाची मोजणी सुरू

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी ५ हजार २६ अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल झाले आहेत. ऑफलाईन पद्धतीने शेवटच्या आठवड्यात मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. प्रत्यक्ष दाखल, पोस्टाने प्राप्त अर्जाची मोजणी सुरू असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

विद्यापीठातील विभागांमध्ये प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. २ एप्रिल ते २ मे दरम्यान केंद्र शासनाच्या ’समर्थ पोर्टल’वरून ‘ऑनलाईन’ पद्धतीने अर्ज मागविले होते. विद्यापीठात अनुदानित ३० विभागांत प्राध्यापक प्रवर्गातील २८९ जागा मंजूर असून, आजघडीला १३० प्राध्यापक कार्यरत आहेत. रिक्त १५९ जागांपैकी ७३ पदे भरण्यास राज्य शासनाच्या उच्चशिक्षण विभागाने ७ ऑगस्ट २०१९ रोजी मान्यता दिली. सप्टेंबर २०२३ मध्ये या भरतीसाठी अर्जही मागविले होते. त्यावेळी ५ हजार ८१५ अर्ज ऑनलाईन, तर सुमारे ४ हजार ६०० हॉर्डकापी जमा झाल्या. तथापि, ही भरती प्रक्रिया जुलै २०२४ मध्ये झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत रद्द करण्यात आली. ही पदे भरण्यास परवानगी देण्यात यावी, यासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेरीस मार्चमध्ये पदभरतीस मान्यता देण्यात आली. नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी ७३ पद भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये प्राध्यापक आठ, सहयोगी प्राध्यापक १२ पदे व सहायक प्राध्यापकांची ५३ पदे भरण्यात येणार आहेत.

समर्थ पोर्टलवर ऑनलाईन प्रक्रिया
केंद्र शासनाने विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयांसाठी ‘समर्थ पोर्टल’ तयार केले असून, या माध्यमातून ही संपूर्ण भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली हाेती. त्यावर अर्ज प्राप्त झाले. तसेच ऑफलाईन पद्धतीने शेवटच्या आठवड्यात मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. प्रत्यक्ष दाखल, पोस्टाने प्राप्त अर्जाची मोजणी सुरू असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

Web Title: 5,000 applications received online for 73 professor posts in the BAMU university, counting of postal applications begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.