नोकरी देतो म्हणून ४९ लाख उकळले, मंत्रालयाचे कोरे लेटर पॅडही सापडले; भामटा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 19:33 IST2025-09-09T19:32:48+5:302025-09-09T19:33:25+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली १५ बेरोजगार तरुणांची फसवणूक

नोकरी देतो म्हणून ४९ लाख उकळले, मंत्रालयाचे कोरे लेटर पॅडही सापडले; भामटा अटकेत
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: नोकरीच्या शोधात असलेल्या १५ बेरोजगार तरुणांना तब्बल ४९ लाख रुपयांना गंडवणाऱ्या एका भामट्याला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सोमवारी रात्री १२ वाजता क्रांती चौकातून अटक केली. आरोपीकडे मंत्रालयातील एका खात्याचे कोरे लेटर पॅड, विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे बोगस शिक्के आणि बनावट नियुक्ती पत्रे सापडल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या अटकेमुळे नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोलिसांनी सापळा रचून पकडले
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली. पोलिसांनी एका बेरोजगार व्यक्तीला आरोपीला द्यायची बाकी असलेली ३ लाख रुपयांची रक्कम तयार असल्याचे सांगून, त्याला छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात बोलावले. पोलिसांच्या पथकाने तेथे आधीच दबा धरून बसून आरोपी भरत दिनानाथ वाहूळ याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून मंत्रालयातील लेटर पॅड, बोगस शिक्के आणि नियुक्ती पत्रे जप्त केली आहेत. मंगळवारी त्याला सिल्लोड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कोठडीतून आणखी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिक्षक ते ठग
आरोपी भरत वाहूळ हा आधी एका संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करत होता. त्यानंतर तो भंगार गाड्यांचा व्यवसाय करू लागला. कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात त्याने नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा धंदा सुरू केला. त्याने केवळ सिल्लोड तालुक्यातीलच नव्हे, तर सातारा, जालना आणि बुलढाणा यांसारख्या विविध जिल्ह्यांतील अनेक तरुणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट शिक्के आणि सह्या वापरून लिपिक आणि शिपाई पदांसाठी बनावट नियुक्तीपत्रे दिली होती.
मोठे रॅकेट असण्याची शक्यता
या प्रकरणाचा तपास करत असताना, पोलिसांना आरोपीकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बोगस ऑर्डर कोठे तयार केल्या, शिक्के कुठे बनवले, मंत्रालयातील लेटर पॅड त्याला कसे मिळाले आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण सामील आहे, याचा तपास सुरू आहे. जर पोलिसांनी या दिशेने सखोल तपास केला, तर आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. या फसवणुकीचा बळी ठरलेल्या अनेकांनी पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.