श्वानांच्या हल्ल्यात ५० जखमा, तरीही मृत्यूला हरवलं! छ. संभाजीनगरातील 'ती' चिमुकली धोक्याबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 18:26 IST2026-03-02T18:26:43+5:302026-03-02T18:26:56+5:30
जखमा भरण्यास वेळ लागेल; पण जखमांच्या वेदना सहन करीत ती स्वत:ची जिद्द दाखवत आहे.

श्वानांच्या हल्ल्यात ५० जखमा, तरीही मृत्यूला हरवलं! छ. संभाजीनगरातील 'ती' चिमुकली धोक्याबाहेर
छत्रपती संभाजीनगर : लहानशा शरीरावर ५० हून अधिक जखमा, असह्य वेदना आणि जगण्यासाठी सुरू असलेली धडपड… नारेगावातील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ४ वर्षीय आयशा सय्यद हिची प्रकृती आता स्थिर आहे. तिने रविवारी हलका आहार घेण्यास सुरुवात केली. तिच्या जखमा भरण्यास वेळ लागेल; पण जखमांच्या वेदना सहन करीत ती स्वत:ची जिद्द दाखवत आहे.
रमजान महिन्यातील पहाट. सहरसाठी घरात हालचाल सुरू असताना शनिवारी पहाटे आयशा घराच्या दारात उभी होती. अचानक ५ ते ६ मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढविला. चाव्यांनी आणि नखांनी तिचे शरीर जखमांनी भरून गेले. मुलीचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत मुलीची मोकाट कुत्र्यांपासून सुटका केली. तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. शरीरावर ५० पेक्षा अधिक खोल जखमा आणि संसर्गाचा गंभीर धोका. बालरोग विभागाच्या युनिट-४ अंतर्गत दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. प्रत्येक जखमेवर रेबीज प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उबेद रहमान आणि डॉ. अनिकेत सरवदे यांचे पथक सतत निरीक्षण ठेवून उपचार करीत आहेत. आयशाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने नातेवाइकांसह रुग्णालयातही दिलासादायक वातावरण आहे.
प्रकृती चांगली
आयशाची प्रकृती कालपेक्षा आज चांगली आहे. ती हलका आहार घेत आहे. डाॅक्टर लक्ष ठेवून आहेत. जखमा खूप आहेत. त्या भरायला वेळ लागेल.
- नसीम सय्यद मुख्तार आयशाची आजी
सर्वतोपरी उपचार
आयशाची प्रकृती चांगली आहे. मोठ्या जखमांना मलमपट्टी करण्यात आली आहे. रेबीज लसही देण्यात आली आहे. आवश्यक ते उपचार सुरू आहेत.
- डाॅ. प्रभा खैरे, बालरोग विभागप्रमुख, घाटी