छत्रपती संभाजीनगरमध्ये नळाच्या पाण्यात ३७० टीडीएस,जारमध्ये फक्त ३०; पाणी कितपत शुद्ध?
By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 20, 2025 18:23 IST2025-05-20T18:20:34+5:302025-05-20T18:23:35+5:30
लोकमत स्टिंग ऑपरेशन: मनपाचे पाणी मध्यम दर्जाचे, आर.ओ.च्या अतिशुद्ध पाण्यात मात्र आवश्यक खनिजांचा अभाव

छत्रपती संभाजीनगरमध्ये नळाच्या पाण्यात ३७० टीडीएस,जारमध्ये फक्त ३०; पाणी कितपत शुद्ध?
छत्रपती संभाजीनगर : बरेच नागरिक आर.ओ.चे पाणी पितात. ते शुद्ध समजतात. पण, अत्यल्प टीडीएस (टोटल डिसॉल्ड सॉलिड्स)मुळे ते आरोग्यास अपायकारक ठरू शकते. हे वास्तव फार थोड्यांना माहीत आहे. शहरातील विविध भागांतील टीडीएस तपासणीचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. मनपाच्या नळाचे पाणी ३७० टीडीएस मि. ग्रॅ. प्रति लिटर असे प्रमाण आहे. ते मध्यम दर्जाचे आहे. कारण हे प्रमाण पाचशेपेक्षा कमी असावे. जारच्या पाण्यात (आर.ओ.) हे प्रमाण फक्त ३० असल्याने ते अतिशुद्ध आहे. पण आर.ओ.मुळे यातील आवश्यक खनिजे कमी होत असल्याने तेही फार आरोग्यदायी नाही. तथापि पाणीटंचाई व शुद्धतेच्या हट्टामुळे अनेक जण हे आर.ओ.चे पाणी पित आहेत.
३० ते ३५० टीडीएसचे पाणी पितात शहरवासीय
शहरातील विविध भागांमध्ये जारचे पाणी, विहिरीचे पाणी, पाण्याच्या टाक्यांमधील आणि बोअरवेलमधील पाण्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये टीडीएस पातळी ३० ते ३५० (मिग्रॅ/लि.) दरम्यान असल्याचे आढळले. टीडीएस म्हणजे पाण्यात विरघळलेले सेंद्रिय पदार्थ आणि पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर यांसारख्या अजैविक क्षारांचा समावेश असतो. यातील काही घटक शरीराला गरजेचे असतात. मात्र, याचेही प्रमाण ठरावीक असावे. पाण्यात किती घन पदार्थ विरघळले, ते प्रतिबिंबित करते. मिलिग्रॅम प्रति लिटरमध्ये टीडीएस मोजले जाते.
टीडीएस स्तरानुसार पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता वर्गवारी (०-५०० मिलिग्रॅम प्रति लिटर)
बीआयएस व डब्ल्यूएचओ आणि जलतज्ज्ञांच्या सामान्य शिफारशीवर आधारित तक्ता.
टीडीएस श्रेणी (मिग्रॅ/लि) --- गुणवत्ता वर्णन --- पिण्यासाठी योग्यतेचे मूल्यांकन
१) ०-५०-- अति शुद्ध-- खूपच कमी खनिज : चव फिकी, नैसर्गिक नाही. काही बाबतीत दीर्घ काळ वापर योग्य नाही.
२) ५१-१५०-- अतिशय चांगले-- उत्तम चव व सुरक्षितता; आरोग्यासाठी फायदेशीर.
३) १५१-२५०-- चांगले-- सामान्यत: चांगले; नैसर्गिक खनिजांसह संतुलित.
४) २५१-३५०-- मध्यम उत्तम-- सहन करण्याजोगे, पण काहींना चव कमी वाटू शकते.
५) ३५१-५००-- मर्यादित स्वीकार्य-- वापर योग्य आहे, पण टीडीएस वाढल्यास चव, कठीणता आणि इतर दुष्परिणाम होऊ शकतात.
आरओ फिल्टरमुळे टीडीएस घटते, पण...
आजघडीला आरओ (रिव्हर्स ऑस्मोसिस) तंत्रज्ञानामुळे पाण्यातील टीडीएस झपाट्याने घटवले जाते. मात्र, त्यामुळे पाण्यातील आवश्यक खनिजेही नष्ट होतात. त्यामुळे ०-५० (मिग्रॅ/लि) टीडीएस असलेले पाणी फारच शुद्ध असते. पण त्यातील खनिजांची कमतरता दीर्घकाळ पिण्यासाठी नुकसानदायक ठरू शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
अतिशुद्ध पाणी देखील आरोग्यास त्रासदायक
पिण्याचे पाणी हे फक्त स्वच्छ असले पाहिजे असे नाही, तर त्यात नैसर्गिक खनिजांचे संतुलनही अत्यावश्यक आहे. त्यामुळे जलशुद्धिकरण उपकरणांचा वापर करताना टीडीएस किती आहे. हे तपासणे अत्यावश्यक आहे. कारण, अतिशुद्ध पाणीदेखील आरोग्यास त्रासदायक ठरू शकते.
कशी, कुठे केली पाण्यातील टीडीएसची तपासणी ?
सत्यता पडताळणी
१) सिडको एन ५ पाण्याची टाकी : सिडकोतील पाण्याच्या टाकी परिसरात टँकर भरले जातात. येथे शुद्धीकरण केलेले पाणी ट्रॅक्टरद्वारे विविध भागांत वितरणासाठी जात असते. यातील एका ट्रॅक्टरमागील पाण्याने भरलेल्या टाकीत टीडीएस तपासणी उपकरणाद्वारे पाणी तपासले असता तिथे ३१० टीडीएस आढळले.
२) छावणीतील जार विक्री केंद्र : छावणीतील गुरुवारच्या आठवडी बाजारसमोरील परिसरात एक जार विक्री केंद्र आहे. येथे आर.ओ.चे शुद्ध पाणी मिळते. येथे पाण्याचे एटीएम मशीन बसविण्यात आले आहे. येथील पाण्यात ४९ (मिल ग्रॅ/ लिटर) टीडीएस असल्याचे दिसले.
३) टिळकनगर जार विक्री केंद्र : टिळकनगरात जार विक्री केंद्र आहे. येथे आर.ओ.चे शुद्ध पाणी विकले जाते. जेव्हा टीडीएस उपकरणाद्वारे येथील पाण्याची तपासणी केली असता. ६० (मिल ग्रॅ/ लिटर) टीडीएस होते.
४) बसस्टँड रोड : महावीर चौकाकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एका हॉटेलमध्ये फ्रिजरमधील थंड पाणी ग्राहकांना पिण्यासाठी दिले जात होते. या पाण्याचे टीडीएस मोजले असते ते ४३०(मिल ग्रॅ/ लिटर) निघाले.
५) क्रांती चौक : क्रांती चौक परिसरातील एका दुकानात मनपाच्या नळाच्या पाण्याची तपासणी केली असता. त्याचे टीडीएस २८० (मिल ग्रॅ/ लिटर), याच परिसरातील दुसऱ्या दुकानात जारचे पाणी ६० (मिल ग्रॅ/ लिटर) टीडीएस होते.
६) पुंडलिकनगर : पुंडलिकनगर परिसरात नळाच्या पाण्याची टीडीएस तपासणी करण्यात आली. यात ३७० (मिल ग्रॅ/ लिटर) टीडीएस होते.
७) बीड बायपास : बीड बायपास येथील प्रथमेश विहार, मधुमालतीनगर येथील बोअरच्या पाण्याची तपासणी केली असता. ३४० (मिल ग्रॅ/ लिटर) टीडीएस आढळले, तर जारच्या पाण्याची तपासणी केली असता ३० टीडीएस असल्याचे दिसले.
५०० टीडीएसपर्यंतचे पाणी लाभदायक
५०० पर्यंत टीडीएस असलेलं पाणी केवळ सुरक्षितच नाही, तर त्यात नैसर्गिक खनिजाचे योग्य प्रमाण असल्याने आरोग्यास लाभदायक देखील असते. म्हणूनच आरओ फिल्टर वापरताना फार कमी टीडीएस करू नये, त्याऐवजी ७५ ते ५०० चा स्तर राखणे सर्वाेत्तम ठरते. हा नियमच आहे.
... तर टीडीएसचे प्रमाण वाढते
नदी, धरण, विहीर, बोअर, नळाच्या पाण्याचे टीडीएस वेगवेगळे असते. नदी व धरणाच्या पाण्याचे टीडीएस कमी असते, तर जमिनीत खोल पाणी केल्यास टीडीएसचे प्रमाण वाढते.
- राहुल बियाणी, मुख्य केमिस्ट