जायकवाडीच्या १८ दरवाजांतून ३७ हजार क्यूसेक विसर्ग, अडीच महिन्यांपासून दरवाजे सुरूच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:24 IST2025-10-30T18:21:59+5:302025-10-30T18:24:09+5:30
रात्रीतून पाण्याची आवक आणखी वाढल्यास गोदावरी नदीपात्रातील विसर्गही वाढवण्यात येईल.

जायकवाडीच्या १८ दरवाजांतून ३७ हजार क्यूसेक विसर्ग, अडीच महिन्यांपासून दरवाजे सुरूच!
पैठण : जायकवाडी धरण क्षेत्र आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी १८ दरवाजांतून ३७ हजार ७२८ क्यूसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
बुधवारी सकाळी ८ वाजता जायकवाडीतून १८ हजार ८६४ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. त्यानंतर आवक वाढल्यामुळे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हा विसर्ग वाढवून धरणाचे १८ दरवाजे दोन फुटाने उघडून ३७ हजार ७२८ क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रात्रीतून पाण्याची आवक आणखी वाढल्यास गोदावरी नदीपात्रातील विसर्गही वाढवण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.
अडीच महिन्यांपासून दरवाजे सुरूच
जायकवाडी धरण यावर्षी शंभर टक्के भरल्यामुळे धरणात येणारे सर्व पाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. आज रोजी धरणाची पाणी पातळी १५२२ फुटांवर असून, जिवंत पाणीसाठा २१७०.९३५ दलघमी आहे. सध्या धरणातील पाण्याची सध्याची आवक ३७ हजार ७२८ क्यूसेक इतकी आहे. मागील अडीच महिन्यांपासून धरणातून विसर्ग सुरूच आहे.