छत्रपती संभाजीनगरात लवकरच ३४ ई-बस धावणार; बसची संख्या होणार १३५
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 20:29 IST2025-10-25T20:29:14+5:302025-10-25T20:29:43+5:30
सध्या १०० शहर डिझेल बस स्मार्ट सिटीकडे उपलब्ध आहेत. त्यातील जवळपास २० बस खराब झाल्या असून, ८० बस विविध मार्गावर धावत आहेत.

छत्रपती संभाजीनगरात लवकरच ३४ ई-बस धावणार; बसची संख्या होणार १३५
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत राहावी यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने नियोजन केले असून, लवकरच ३४ नवीन ई-बस शहरात दाखल होणार आहेत. त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम जाधववाडी येथील बसडेपोत अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सध्या १०० शहर डिझेल बस स्मार्ट सिटीकडे उपलब्ध आहेत. त्यातील जवळपास २० बस खराब झाल्या असून, ८० बस विविध मार्गावर धावत आहेत.
स्मार्ट सिटीची शहर बससेवा २०१८ पासून सुरू आहे. दररोज २० ते २२ हजार प्रवासी या बससेवेचा लाभ घेतात. शहरी भागापेक्षा ग्रामीणमध्ये बससेवा अधिक लोकप्रिय ठरली आहे. वाळूज, फुलंब्री, करमाड, पैठण रोड आदी भागात बसची मागणी वाढू लागली आहे. डिझेल बसला इंधन आणि मेंटनन्स खर्च खूप आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक ई-बस आणण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी स्मार्ट सिटीने घेतला. त्यासाठी हैदराबाद येथील एका एजन्सीबरोबर करार करून ३५ ई-बस भाडेतत्त्वावर घेण्याचे ठरविले. मागील वर्षीच दिवाळीपूर्वी ई-बस शहरात दाखल होणार होत्या. मात्र, चार्जिंग स्टेशनचे काम अपूर्ण राहिल्याने बस आणता आल्या नाहीत.
बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम जाधववाडी येथील बस डेपोच्या आवारात सुरु आहे. चार्जिंग स्टेशनसाठी महावितरण कंपनीच्या माध्यमातून एचटी लाईन, स्वतंत्र फिडर आणि विजेचे उपकेंद्र उभारणीला देखील वेळ लागला. आता हे काम पूर्णत्वास येत असून चार्जिंग स्टेशनवर शेड बांधणीचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती बस विभागाचे मुख्य चालान अधिकारी संजय सुपेकर यांनी दिली. महिनाभरात ई-बस दाखल होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एक बस अगोदरच दाखल
हैद्राबाद येथील कंपनीने एक ई-बस १ सप्टेंबर २०२५ रोजी पाठविली. शहरालगतच्या परिसरासाठी ही बस चालवण्यात येत आहे. या बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणखीन ३४ बस प्राप्त झाल्यावर ३५ ई-बस शहरात धावू लागतील.