३२ वर्षांत सेनेकडे महापौरपद १४ वेळा, तर भाजपकडे ४ वेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 18:17 IST2020-03-02T18:07:27+5:302020-03-02T18:17:04+5:30
शहरात कुणी काय केले यावरून सध्या जोरदार राजकारण पेटले आहे.

३२ वर्षांत सेनेकडे महापौरपद १४ वेळा, तर भाजपकडे ४ वेळा
औरंगाबाद : महापालिकेची स्थापना ८ डिसेंबर १९८२ रोजी झाली; परंतु पहिल्या सार्वत्रिक निवडणुका १९८८ साली झाल्या. पालिकेचा पहिला महापौर म्हणून काँग्रेसचे शांताराम काळे यांना संधी मिळाली. ३२ वर्षांच्या काळात सर्व मिळून २२ महापौर शहराने पाहिले. यामध्ये १४ वेळा शिवसेनेकडे महापौरपद राहिले, तर ४ वेळा भाजपला महापौरपदावर विराजमान होण्याची संधी मिळाली. ३ वेळा काँग्रेस, तर एकदा शिवसेना-भाजपच्या मदतीने अपक्ष नगरसेवकाला महापौरपदावर विराजमान होण्याचे भाग्य लाभले.
कुणाच्या काळात कोणती कामे झाली. कोणत्या सत्ताधारी पक्षाने या शहराला अविस्मरणीय अशी सार्वजनिक योजना देऊन ती पूर्णत्वास नेण्यासाठी परिश्रम घेतले, याचे मूल्यांकन येणाऱ्या निवडणुकीत मतदार निश्चितच करतील; परंतु कुणी काय केले यावरून सध्या जोरदार राजकारण पेटले आहे. ३२ वर्षांत ७ महिला महापौर झाल्या. यामध्ये सहा शिवसेनेच्या, तर एका भाजपच्या महापौराचा समावेश होता. आजवरच्या तीन दशकांचा धांडोळा घेतला, तर शिवसेना आणि भाजपकडेच सर्वाधिक महापौर, उपमहापौर पदे गेली आहेत. ज्यावेळी शिवसेनेचा महापौर, त्यावेळी भाजपचा उपमहापौर, असे समीकरण सत्तेत्त ठरलेले होते.
नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यात सत्ता स्थापनेवरून शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे पालिकेतही भाजपने उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. सध्या दोन्ही पदांवर शिवसेनेचे नगरसेवक आहेत. पालिकेचा तीन दशकांचा इतिहास पाहिला तर शिवसेनेला महापौरपदाचा जास्त वर्षांचा कार्यकाळ मिळाला आहे. त्या तुलनेत भाजप, काँग्रेसच्या वाट्याला कमी कालावधी आला.
शिवसेनेचे आजवर झालेले महापौर : मोरेश्वर सावे, प्रदीप जैस्वाल, सुनंदा कोल्हे, गजानन बारवाल, शीला गुंजाळ, सुदाम सोनवणे, विकास जैन, विमल राजपूत, रुक्मिणी शिंदे, किशनचंद तनवाणी, अनिता घोडेले, कला ओझा, त्र्यंबक तुपे, नंदकुमार घोडेले (विद्यमान महापौर).
भाजपचे झालेले महापौर : डॉ. भागवत कराड (दोन वेळा संधी मिळाली), विजया रहाटकर, भगवान घडामोडे.
इतर पक्षांचे महापौर : अब्दुल रशीद खान (मामू).
काँग्रेस पक्षाला मिळालेली संधी : डॉ. शांताराम काळे, मनमोहनसिंग ओबेरॉय, अशोक सायन्ना.