३०:३० घोटाळ्याचा मास्टरमाईंड पुन्हा अटकेत, नव्याने दाखल १५ कोटींच्या गुन्ह्यात ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:25 IST2025-01-07T13:20:07+5:302025-01-07T13:25:01+5:30
२०२१ मध्ये समोर आलेल्या या घोटाळ्याने राज्याला हादरवून सोडले होते. तेव्हा ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कृष्णाला अटक झाली होती.

३०:३० घोटाळ्याचा मास्टरमाईंड पुन्हा अटकेत, नव्याने दाखल १५ कोटींच्या गुन्ह्यात ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या ३०:३० घोटाळ्याचा मास्टरमाइंड कृष्णा एकनाथ राठोडला शहराच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी हर्सूल कारागृहातून ताब्यात घेतले. नोव्हेंबर महिन्यात त्याच्यावर नव्याने दाखल झालेल्या १५.४७ कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आल्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
प्रमोद जाधव (रा. बंजारा कॉलनी) यांच्या १.९५ कोटींच्या फसवणुकीच्या तक्रारीवरून दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात राठोडविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. संतोषसह राजेंद्र उर्फ पंकज प्रल्हाद जाधव (रा. गोलवाडी), सुहास पंडित चव्हाण (रा. बंजारा कॉलनी) आणि अमोल कृष्णा चव्हाण (रा. नाईकनगर) यांनी गुंतवणुकीवर १५ टक्क्यांच्या परताव्याचे आमिष दाखविले. त्यामुळे प्रमोद यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी ५० लाख, त्यांचे चुलत भाऊ राजेंद्र जाधव यांनी एक कोटी ४५ लाखांची गुंतवणूक केली. मात्र त्यांना परतावा मिळाला नाही. २०२१ मध्ये समोर आलेल्या या घोटाळ्याने राज्याला हादरवून सोडले होते. तेव्हा ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कृष्णाला अटक झाली होती.
नंतर नेमके काय झाले?
दि. १६ नोव्हेंबरला २०२१ ला बिडकीन ठाण्यात ज्योती ढोबळे या महिलेच्या तक्रारीवरून पहिला गुन्हा दाखल झाला. त्यात अटकेनंतर कृष्णासह अन्य ६ आरोपींवर ५०० पानांचे दोषारोपपत्रही दाखल केले होते. त्यात हा घोटाळा ६८ कोटींचा असल्याचे म्हटले होते. कालांतराने कृष्णाला जामीन मंजूर झाला.
एमपीआयडी कायद्यासह गुन्हा दाखल
नोव्हेंबर महिन्यात शहरात गुन्हा दाखल होताना कृष्णावर एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा नव्यानेच तपास होणार असल्याने प्रमोद यांच्यानंतर जवळपास ५४ तक्रारदारांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. त्यामुळे हा आकडा सध्या १५ कोटींपर्यंत पोहोचला आहे. सोमवारी उपनिरीक्षक चंद्रकांत कामटे, अंमलदार सखाराम मोरे, प्रभाकर राऊत, संदीप जाधव यांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दि. १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.