वीज बिल कमी करण्यासाठी ३० हजारांची लाच; महावितरणच्या अभियंत्यासह खासगी पंटर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 07:46 PM2021-09-07T19:46:40+5:302021-09-07T19:46:58+5:30

विशेष म्हणजे औरंगाबादच्या पथकाने जालन्यात जाऊन ही कारवाई केली.

30,000 bribe to reduce electricity bill; Caught a private punter with an MSEDCL engineer | वीज बिल कमी करण्यासाठी ३० हजारांची लाच; महावितरणच्या अभियंत्यासह खासगी पंटर पकडला

वीज बिल कमी करण्यासाठी ३० हजारांची लाच; महावितरणच्या अभियंत्यासह खासगी पंटर पकडला

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबादच्या एसीबी पथकाची जालन्यात सापळा

औरंगाबाद : वीज बिलाची रक्कम कमी करण्यासाठी कंत्राटदाराकडून ३० हजार रुपये लाच घेताना महावितरणच्या जालना येथील उपविभागीय कार्यालयातील अतिरक्त कार्यकारी अभियंत्यासह त्याच्या पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. विशेष म्हणजे औरंगाबादच्या पथकाने जालन्यात जाऊन ही कारवाई केली.

कार्यकारी अभियंता रेवानंद लक्ष्मण मोरे आणि खासगी पंटर दीपक रतन नाडे, अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार तक्रारदार हे सोलर पॅनल बसवून देण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला जास्त बिल आले होते. या बिलाची रक्कम कमी करण्यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता मोरे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबाद परिक्षेत्राचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे मोरेची तक्रार केली. यानंतर पोलीस उपअधीक्षक रूपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, हवालदार बाळासाहेब राठोड, दिगंबर पाठक, केवलसिंग गुसिंगे, चालक चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी पुन्हा त्यांच्याकडे ३० हजार रुपये लाच मागितली आणि ७ सप्टेंबर रोजी लाचेची रक्कम घेऊन बोलावले.

ठरल्याप्रमाणे मंगळवारी सकाळी एसीबीच्या अधिकारी, कर्मचारी यांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. तक्रारदार यांना लाचेची रक्कम घेऊन मोरे यांच्याकडे पाठविले. मोरे यांनी लाचेची रक्कम त्यांचा पंटर खासगी वाहनचालक दीपक नाडे याच्याकडे देण्यास सांगितले. मोरे यांच्या सांगण्यावरून नाडेने तक्रारदार यांच्याकडून लाचेचे ३० हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी त्यास रंगेहात पकडले. यानंतर मोरे यासही ताब्यात घेतले. याप्रकरणी जालना येथील कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविणयात आला.

Web Title: 30,000 bribe to reduce electricity bill; Caught a private punter with an MSEDCL engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.