छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्ते रुंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, आतापर्यंत तीन रस्ते ६० मीटर रुंद करण्यात आले. त्यामुळे महिनाभरात २ हजार ६२२ मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या. एकाही रस्त्यावरील बांधकाम साहित्य उचलण्याचे काम मनपाने सुरू केले नाही. काही मालमत्ताधारकांनी स्वत:च्या खर्चाने मलबा उचलणे, लोखंड जमा करणे सुरू केले.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड बायपासवर महापालिकेने ही मोहीम राबवत ४१८ मालमत्ता पाडल्या होत्या. विशेष बाब म्हणजे, या मोहिमेसाठी पोलिस बंदोबस्तही मिळाला नव्हता. मनपाच्या नागरीमित्र पथकाच्या साहाय्याने पाडापाडी करण्यात आली होती. ही मोहीम थंडावताच १९ जून रोजी मुकुंदवाडीत एका तरुणाचा निर्घृण खून झाला. या घटनेनंतर १२ तासांत मुकुंदवाडीतील २२९ लहान मोठी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली होती. पोलिसांच्या आग्रहावरून ही पाडापाडी केली होती. वातावरण तापलेले असताना मनपाने मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत ६० मीटर रस्ता रुंद करण्यासाठी मोहीम राबविली. यामध्ये सर्वाधिक १३६४ लहान मोठी बांधकामे पाडण्यात आली. ३० जून आणि १ जुलै रोजी पैठण रोडवर ८४० मालमत्ता पाडण्यात आल्या. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अडीच हजारांहून अधिक मालमत्ता पाडण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई अजून थांबलेली नाही. यापुढेही सुरू राहणार आहे. मुख्य रस्ते रुंद झाल्यावर अंतर्गत प्रलंबित रस्तेही मोकळे केले जाणार आहेत.
कोणते रस्ते अजेंड्यावरचंपाचौक ते जालना रोड, आमखास ते जटवाडा रोड, महावीर चौक ते रेल्वेस्टेशन, वसंतराव नाईक चौक ते हर्सूल गाव आदी रस्ते प्राधान्याने मोकळे करण्यात येणार आहेत. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे भविष्यात पुढील कारवाई होणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.
पैठण रोडवरील मलबा उचलणारमहापालिकेच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी सांगितले की, पैठण रोडवरील मलबा उचलण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार गुरुवारी स्वतंत्र टीम लावून मलबा उचलण्याचे काम करण्यात येणार आहे.
महापालिका थांबणार नाहीप्रशासक जी. श्रीकांत यांनी यापूर्वीच महापालिका आता थांबणार नाही, अशी घोषणा केली आहे. ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर राज्याच्या पर्यटनाची राजधानी असून, येथे लाखो पर्यटक दररोज येतात. पर्यटन नगरी म्हणून रस्ते मोठे, रुंद ठेवणे आवश्यक असल्याचेही प्रशासकांनी नमूद केले आहे. प्रशासन निव्वळ पाडापाडी करून थांबणार नाही, सर्व्हिस रोडसुद्धा करणार आहे.