फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात २५० किलो वॅटचा सौर प्रकल्प; वीज बचतीसाठी मनपाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 17:00 IST2024-12-07T16:59:33+5:302024-12-07T17:00:26+5:30
महापालिका प्रशासनाला पाणीपुरवठा, पथदिवे, कार्यालयांमधील विजेचे बिल ५ कोटींपर्यंत अदा करावे लागते.

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात २५० किलो वॅटचा सौर प्रकल्प; वीज बचतीसाठी मनपाचे पाऊल
छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेला जायकवाडीहून तीन ठिकाणी पंपिंग करून शहरात पाणी आणावे लागते. पंपिंगमुळे विजेचा खर्च प्रचंड वाढला आहे. नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यानंतर हा खर्च चौपट वाढणार आहे. त्यामुळे महापालिका आतापासूनच छोटे-छोटे सौर प्रकल्प उभारत आहे. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात २५० किलो वॅटचा प्रकल्प उभारण्यात येतोय. महिनाभरात हे काम पूर्ण होईल.
महापालिका प्रशासनाला पाणीपुरवठा, पथदिवे, कार्यालयांमधील विजेचे बिल ५ कोटींपर्यंत अदा करावे लागते. शासनाकडून दरमहा जीएसटीची रक्कम मिळते. त्यातून काही पैशांची बचत करून बिल भरावे लागते. एखाद्या महिन्यात उशिरा भरले तर महावितरण कंपनीकडून वीज कापली जाते. ही नामुष्की येऊ नये म्हणून मनपा दरमहा बिल वेळेवर भरते. जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत आणि शहरातील जलकुंभाचे बिल मोठ्या प्रमाणात येते. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी जास्तीत जास्त सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला आहे. विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांनी सांगितले की, फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रावर २५० किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. ४० सोलार पॅनल बसविण्यात आले आहेत. ग्रीडशी जोडणी करून उत्पादित होणारी वीज थेट महावितरणला देण्यात येणार आहे. याकरिता १५ व्या वित्त आयोगातून १ कोटी ८१ लाख रुपयांचा खर्च होत आहे. महिनाभरात हा प्रकल्प कार्यान्वित होईल.
सिद्धार्थ उद्यान, मेल्ट्रॉन रुग्णालयातही सौर ऊर्जा
सिद्धार्थ उद्यानाच्या वीजबिलात बचत करण्यासाठी दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी १०० किलो वॅटचा प्रस्ताव तयार केला आहे. मनपाच्या निधीतून ८६ लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. मेल्ट्रॉनच्या हॉस्पिटलच्या इमारतीवर ७० किलो वॅटचा प्रकल्प आरोग्य विभागाच्या ५१ लाख रुपयांच्या निधीतून राबविला जाणार आहे.