२५ टक्के मराठवाडा टँकरच्या पाण्यावर; ४५ लाख लोकसंख्या पाण्याविना झाली व्याकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 18:03 IST2019-05-08T18:01:59+5:302019-05-08T18:03:04+5:30
या दशकातील सर्वाधिक भीषण दुष्काळ

२५ टक्के मराठवाडा टँकरच्या पाण्यावर; ४५ लाख लोकसंख्या पाण्याविना झाली व्याकूळ
औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे २५ टक्के ग्रामीण लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. २०११च्या जनगणनेनुसार विभागाची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख असून, यंदाच्या भीषण दुष्काळामुळे त्यातील सुमारे ४५ लाख लोक पाण्याविना व्याकूळ आहेत. यंदाच्या वर्षातील दुष्काळ हा या दशकातील सर्वांत भीषण ठरत आहे.
२०१२ नंतर प्रथमच पाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. २ हजार ७०० टँकरने सुमारे २ हजार गावांत आणि ७२५ वाड्यांवर पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. दर आठवड्याला ४२ गावांत टँकरची मागणी पूर्ण करावी लागते. ५१ टँकर त्यासाठी नव्याने सुरू करावे लागत आहेत. मे अखेरपर्यंत हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांतील दुष्काळ परिस्थिती अत्यंत भीषण आहे. उर्वरित जिल्ह्यांतही दुष्काळाच्या झळा बसत आहेत; परंतु त्या जिल्ह्यात थोड्या-फार प्रमाणात पाणी असल्यामुळे टँकरचा आकडा कमी आहे. ४४५९ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत.
जिल्हा लोकसंख्या गावे टँकर
औरंगाबाद सोळा लाख ६९२ १०३१
जालना साडेनऊ लाख ४१६ ४९६
परभणी एक लाख २९ ४४
हिंगोली एक लाख २४ ३८
नांदेड सव्वालाख ४५ ७८
बीड बारा लाख ५९१ ८२६
लातूर सव्वा लाख ३४ ४५
उस्मानाबाद तीन लाख ११३ १३१
एकूण अंदाजे ४५लाख १९४४ २६८९