अबब... विद्यापीठात २३ लाख उत्तरपत्रिका धूळखात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 14:06 IST2019-02-14T14:02:49+5:302019-02-14T14:06:54+5:30
प्रशासनाने शिल्लक उत्तरपत्रिकांचा वापर न करता खरेदी करण्याचा घाट घातला होता.

अबब... विद्यापीठात २३ लाख उत्तरपत्रिका धूळखात पडून
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व परीक्षा विभागात तब्बल २३ लाख उत्तरपत्रिका मागील चार वर्षांपासून धूळखात पडून असल्याची धक्कादायक माहिती परीक्षा मंडळाच्या (बीओई) बैठकीत समोर आली. तरीही प्रशासनाने शिल्लक उत्तरपत्रिकांचा वापर न करता खरेदी करण्याचा घाट घातला होता. हा घाट मंडळाच्या सदस्यांनी उधळून लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठ परीक्षा मंडळाची बैठक कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.१३) झाली. या बैठकीत शिल्लक उत्तरपत्रिकांची माहिती बीओईने ठेवण्याची मागणी सदस्य डॉ. गोविंद काळे यांनी केली होती. यानुसार महाविद्यालयांकडे तब्बल १६ लाख उत्तरपत्रिकांचा साठा शिल्लक आहे. तसेच २०१४ मध्ये खरेदी केलेल्या बार कोडच्या ५ लाखांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका वापरण्यात आलेल्या नाहीत. तसेच ३६ पानांच्या १ लाख ९२ हजार उत्तरपत्रिकांचाही वापर केलेला नाही.
एवढा मोठा साठा शिल्लक असतानाही परीक्षा विभाग येत्या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिकांची खरेदी करण्याच्या तयारीत होता. ऐनवेळी उत्तरपत्रिका कमी पडल्यास अडचण होईल, असा दावा करण्यात येत होता. मात्र पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या एका सत्राच्या परीक्षेसाठी २२ लाख उत्तरपत्रिका लागतात. तेवढा साठा उपलब्ध आहे. यामुळे जुन्या उत्तरपत्रिका संपल्याशिवाय नवीन उत्तरपत्रिकांच्या खरेदीला डॉ. गोविंद काळे यांनी तीव्र विरोध दर्शविला. अगोदर शिल्लक साठा संपल्याशिवाय खरेदी करू नये, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तसेच अधिक कठीण परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी २ लाख उत्तरपत्रिकांच्या निविदा मागवून ठेवाव्यात, परीक्षा सुरू असताना कमी पडण्याचा अंदाज आल्यास खरेदी कराव्यात, असा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पदवी, पदव्युत्तर परीक्षांच्या तारखा बदलणार
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तरच्या परीक्षा आठ दिवसांनी लांबणीवर टाकण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी दिली. नियोजित तारखानुसार ११ व १३ मार्च रोजी परीक्षांना सुरुवात होणार होती. मात्र बैठकीत एक आठवडा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार दोन दिवसात वेळापत्रक तयार केले जाईल, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
विधि प्रश्नपत्रिकांची समिती चौकशी करणार
एम. पी. लॉ महाविद्यालयातील सराव प्रश्नपत्रिका आणि विद्यापीठाने परीक्षेत काढलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साधर्म्य आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. एम. पी. लॉ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी या प्रश्नपत्रिका काढल्या असून, त्याच प्रश्नांचा सराव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून करून घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. याविषयीचा ठराव बीओईच्या बैठकीत चर्चेला आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिष्ठाता डॉ.संजय साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीत डॉ. गोविंद काळे, डॉ. साधना पांडे आणि डॉ. आनंद देशमुख यांचा समावेश आहे. ही समिती चार दिवसांत अहवाल देणार आहे.