मराठवाड्यात २२३ मि.मी. पावसाची तूट; ४८ दिवस गेले कोरडे, आता उरले फक्त ४३
By विकास राऊत | Updated: August 17, 2023 14:07 IST2023-08-17T14:07:08+5:302023-08-17T14:07:24+5:30
आता परतीच्या पावसावरच मदार आहे.

मराठवाड्यात २२३ मि.मी. पावसाची तूट; ४८ दिवस गेले कोरडे, आता उरले फक्त ४३
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ७८ दिवसांत सरासरीच्या फक्त ५० टक्के पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ७१ टक्के पाऊस झाला असला तरी नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात पावसाने दडी मारली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील पावसाळ्यात ६७९.५ मिमी सरासरी पावसाचे प्रमाण असून, ७८ दिवसांमध्ये ३३९.९ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी ५६२ मि.मी. पाऊस झाला होता. या तुलनेत २२३ मि.मी. पावसाची तूट आहे. खरीप हंगामातील पेरण्यांचा पहिला टप्पा संपला असून, ३० सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो असे गृहीत धरले तर आता फक्त ४३ दिवस उरले आहेत. आता परतीच्या पावसावरच मदार आहे.
पावसाळ्याचे ७८ पैकी ४८ दिवस कोरडे गेले आहेत. जून महिन्यात फक्त सात दिवस पाऊस झाला असून, २६ दिवस जुलै महिन्यात कमी-अधिक पाऊस झाला. ऑगस्टमधील १६ दिवस कोरडे गेले आहेत. यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांचे नुकसान झाले. याचा परिणाम विभागातील ८७७ मोठ्या, मध्यम व लघू जलप्रकल्पांवर झाला आहे. ४२ टक्केच उपयुक्त जलसाठा प्रकल्पात आहे.
उद्योग, पिण्याच्या पाण्यावर संकट
४३ दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पुढच्या काळात पिण्याच्या पाण्यासह उद्योगांवर जलसंकट असेल. मागील वर्षी ८६.८७ टक्के जलसाठा होता. पूर्ण प्रकल्पांमध्ये ३ द.ल.घ.मी. पाण्याची आवक मागील चार दिवसांत झाली आहे. जायकवाडी धरणात ३४.२८ टक्के पाणी आहे. सर्व प्रकल्पांत ७७.८९ टीएमसी पाणी आहे. विभागात ४८ लाख ५७ हजार हेक्टरपैकी ४३ लाख ८१ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. गेल्या वर्षी ४८ लाख २३ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या.
जिल्हा.... झालेला पाऊस
औरंगाबाद.... २५४ मि.मी.
जालना.... २५८ मि.मी.
बीड.... २४६ मि.मी.
लातूर.... ३२० मि.मी.
धाराशिव.... २७४ मि.मी.
नांदेड.... ५८२ मि.मी.
परभणी.... २७६ मि.मी.
हिंगोली.... ४३३ मि.मी.
एकूण.... ३३९ मि.मी.