वाळूज औद्योगिक परिसरातून २१७ महिला बेपत्ता, एक महिला आढळली थेट पाकिस्तान सीमेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:58 IST2025-02-03T14:58:08+5:302025-02-03T14:58:38+5:30
कित्येक प्रकरणात काही दिवस सोबत राहिल्यानंतर प्रियकर महिलांना सोडून पळ काढतो.

वाळूज औद्योगिक परिसरातून २१७ महिला बेपत्ता, एक महिला आढळली थेट पाकिस्तान सीमेवर
- संतोष उगले
वाळूज महानगर : औद्योगिक परिसरातून महिला बेपत्ता होण्याची संख्या मोठी आहे. बेपत्ता होणाऱ्या महिलांमध्ये सर्वाधिक २५ ते ३५ वयोगटातील महिलांचा समावेश आहे. कित्येक प्रकरणात काही दिवस सोबत राहिल्यानंतर प्रियकर महिलांना सोडून पळ काढतो. हे वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीतून दिसले.
तरुणांच्या भूलथापांना बळी
बेरोजगार तरुण, उद्योगनगरीत कंत्राटदाराच्या मदतीने तुटपुंजा वेतनावर सहज कामावर रुजू होतात. कंपनीत असल्याची बतावणी करून लग्न करतात. लग्नानंतर वाळूजमध्ये दाखल झाल्यावर मुलींना वास्तव कळते. रिकामटेकडे तरुण आमिष, भूलथापा देऊन जवळीक वाढवतात, त्यातून पुढे पळून जाण्याचे प्रकार घडतात.
प्रकरण पहिले : - मुलांकडे पाठ, प्रियकराचा धरला हात
पती, दोन मुलांसह राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेचे २३ वर्षीय युवकासोबत सूत जुळले. दोघे पळून गेले. पुढे पोलिसांनी दोघांना पाकिस्तान सीमेजवळून परत आणले. धाय मोकलून रडणाऱ्या दोन्ही मुलांकडे व पतीकडे दुर्लक्ष करून तिने प्रियकरासोबतच राहण्याचा निश्चय केला. हतबल पती मुलांना घेऊन घरी परतला.
प्रकरण दुसरे :- पत्नी पुन्हा पतीकडे परतली
लग्नानंतर पतीसोबत गावाकडून आलेली पत्नी औद्योगिक परिसरात राहत होती. काही महिन्यांतच घरालगत किरायाने राहणाऱ्या तरुणासोबत ती निघून गेली. पुढे काही दिवसांनी तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्याने पत्नी पतीकडे परतली; परंतु समाजात बदनामी झाल्याने पतीने पत्नीला सांभाळण्यास नकार दिला. सुखी संसाराला एका घटनेमुळे वेगळे वळण लागले. आजही घरातील मोठी मंडळी पतीची समजूत काढत आहेत.
प्रकरण तिसरे :- मुलीवर हलाखीची वेळ
लग्नाचे आमिष दाखवून विवाहित इसमाने २२ वर्षीय तरुणीला फूस लावून पळवले. आपण अविवाहित असल्याची थाप त्याने मारली होती. वास्तव समजल्यानंतर मुलीने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. दुसरीकडे घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने हे पाऊल उचलल्याने घरच्यांनी तिला स्वीकारले नाही. आज मुलीवर हलाखीची वेळ आली आहे.
आकडे बोलतात
गेल्या वर्षभरामध्ये तब्बल २१७ महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील १४८ महिला आढळून आल्या आहेत, तर अद्यापही ६९ बेपत्ता महिलांचा शोध सुरू आहे. महिलांनी चुकीचे पाऊल उचलण्यापूर्वी भविष्याचा विचार करावा, असा सल्ला दीड वर्षापासून ३०० पेक्षा अधिक प्रकरणांचा तपास करणाऱ्या महिला अंमलदार रेखा चांदे या देतात.