लाड-पागे समितीचा लाभ घेणारे बोगस २१ जण बडतर्फ; क्लर्कने लाखों रुपये घेऊन केला घोटाळा

By विकास राऊत | Updated: June 7, 2025 19:47 IST2025-06-07T19:46:45+5:302025-06-07T19:47:11+5:30

सार्वजनिक बांधकाम : ७, १०, १५ लाख रुपये देऊन मिळविली होती नोकरी

21 bogus people who took advantage of Lad-Page committee dismissed; Clerk scammed by taking lakhs of rupees | लाड-पागे समितीचा लाभ घेणारे बोगस २१ जण बडतर्फ; क्लर्कने लाखों रुपये घेऊन केला घोटाळा

लाड-पागे समितीचा लाभ घेणारे बोगस २१ जण बडतर्फ; क्लर्कने लाखों रुपये घेऊन केला घोटाळा

छत्रपती संभाजीनगर : लाड-पागे समितीने चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी भरती करण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांत बोगसगिरी करून नाेकरी मिळविणाऱ्या २१ जणांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ७, १० व १५ लाख रुपये घेऊन आस्थापना विभागातील काही महाभागांनी नातेवाइकांनाच फसविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची व्याप्ती मराठवाड्यातील प्रत्येक सर्कलपर्यंत असण्याची शक्यता आहे. काही प्रकरणे समोर आल्यानंतर याबाबत चौकशी समिती नेमल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली. यात २१ जणांना बेकायदेशीररीत्या भरती केल्याचे समोर आले.

आस्थापना विभागाचा क्लार्क अंकुश हिवाळेला याप्रकरणात निलंबित केले आहे. कार्यकारी अभियंत्यांनी या प्रकरणात समिती स्थापन केली होती. ज्यांची भरती केली गेली, त्यांनी फसगत झाल्याचे समितीला लेखी दिले. निलंबित क्लार्क हिवाळे याने पैसे घेऊन आम्हाला सेवेत घेतल्याचे अनेकांनी नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान या फसवणुकीबाबत कुणीही वाच्यता करण्यास तयार नाही, अशा पद्धतीने अनेक जणांची भरती झाल्याची शक्यता आहे. ७ ते १५ लाखांपर्यंत रक्कम यासाठी घेण्यात आली आहे. विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांनाच गंडविले. सध्या तरी २१ जणांकडून सरासरी १५ लाख घेतले असतील, तर ३ कोटींचा घोटाळा यात दिसत आहे. बांधकाम विभागात सेवेत घेण्यासाठी बडतर्फ कर्मचाऱ्यांनी ज्यांच्याकडे रक्कम दिली, त्यांच्या विरोधात त्यांनी पोलिसांकडे धाव घेणे गरजेचे आहे. बांधकाम विभागाने या प्रकरणात फक्त निलंबन कारवाई केली असून, अद्याप कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.

क्लार्क हिवाळेचे निलंबन...
काही जणांनी नोकरी मिळाल्यानंतर विवाह केले. आता बडतर्फीच्या कारवाईनंतर त्यांच्यावर वाईट परिस्थिती आली आहे. दोन दिवसांपूर्वी १५ जणांवर कारवाई केली. आस्थापना क्लार्क अंकुश हिवाळेला निलंबित केले आहे.
- एस. एस. भगत, अधीक्षक अभियंता

असा उघडकीस आला घोटाळा...
मराठवाड्याच्या नॅशनल हायवेचे सर्कल ऑफीस येथे आहे. आठही जिल्ह्यांचे ते कार्यालय आहे. निलंबित क्लार्क हिवाळे व इतर कर्मचाऱ्यांनी अपॉइंटमेंट नांदेड, लातूर व इतर जिल्ह्यांत दिली. दोन ते तीन वर्षे नियमित लोकांना काही समजले नाही. ३ वर्षांनंतर बदली केल्यानंतर कर्मचारी भरतीच केलेले नसताना त्यांची बदली इकडे झालीच कशी, असा प्रश्न येथील वरिष्ठांना पडला. एकावरून अनेक कर्मचारी बोगस भरती झाल्याचे समोर येण्यास सुरुवात झाल्यानंतर लाड-पागे समितीच्या नावाने बोगस भरती केल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: 21 bogus people who took advantage of Lad-Page committee dismissed; Clerk scammed by taking lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.