जीममध्ये व्यायामानंतर अचानक चक्कर येऊन कोसळली; २० वर्षीय तरुणीचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 17:22 IST2025-09-13T17:22:05+5:302025-09-13T17:22:35+5:30

प्रियंका बी. फार्मसी पदवीधर असून गेल्या महिन्याभरापासून भाऊ व मैत्रिणीसह नियमित व्यायाम करण्यासाठी जीममध्ये जात होती.

20-year-old woman dies of heart attack after suddenly collapsing after exercising in gym | जीममध्ये व्यायामानंतर अचानक चक्कर येऊन कोसळली; २० वर्षीय तरुणीचा हृदयविकाराने मृत्यू

जीममध्ये व्यायामानंतर अचानक चक्कर येऊन कोसळली; २० वर्षीय तरुणीचा हृदयविकाराने मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : गुरुवारी सायंकाळी व्यायाम झाल्यानंतर जीममध्ये अचानक चक्कर येऊन पडलेल्या २० वर्षीय प्रियंका अनिल खरात या तरुणीचा हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना शहरातील बीड बायपास परिसरात घडली. प्रियंका बी. फार्मसी पदवीधर असून गेल्या महिन्याभरापासून भाऊ व मैत्रिणीसह नियमित व्यायाम करण्यासाठी जीममध्ये जात होती.

गुरुवारी सायंकाळी प्रियंका वडिलांना चहा करून देऊन ‘मी जीमला जाऊन येते’ असे सांगून निघाली होती. भाऊ यश व मैत्रीण प्रणाली कुलकर्णी हे सुद्धा सोबत होते. प्रणालीने सांगितले की, जीममध्ये जाताना तिने काही दुखते असे सांगितले नाही, हसत खेळत तिने व्यायाम केला. व्यायाम संपल्यानंतर भावाची वाट पाहत असतानाच तिला अचानक चक्कर आली व ती खाली कोसळली.

तिला तातडीने जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी सात ते साडेसात वाजेदरम्यान तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. बीड बायपास येथील म्हस्के पेट्रोलपंपाशेजारील अपार्टमेंटमध्ये प्रियंका कुटुंबासह राहत होती. तिचे वडील अनिल खरात हे कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. प्रियंका ही कुटुंबातली मोठी मुलगी होती. तिच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. सायंकाळी तिच्या पार्थिवावर गादीया विहार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान वयात हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत.

प्रियंकाने दिलेला संध्याकाळचा चहा शेवटचा ठरला...
अनिल खरात यांनी सांगितले की, प्रियंकाची आई कामानिमित्त बाहेर गेली असताना सायंकाळी प्रियंकाने मला चहा करून दिला. बाबा मी जीमला जाऊन लवकर येते, असे म्हणून ती गेली व तिच्या हाताने बनविलेला चहा शेवटचा ठरला.

भाऊ-बहिणीचे नाते घट्ट
प्रियंका व तिचा भाऊ यश या दोघांत मैत्रीचे नाते होते, ते सतत सोबत वावरत असत. अगदी, भाजी आणायची असो वा फेरफटका मारायचा, दोघेही कधी एकटे जात नसत. जीमलाही त्यांनी एकत्र सुरुवात केली होती. त्यामुळे बहिणीच्या आकस्मिक निधनाने यशला मोठा धक्का बसला. आता प्रियंका कधीच सोबत राहणार नाही, असे म्हणत त्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.

व्यायामापूर्वी वाॅर्मअप महत्त्वाचे
व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करणे खूप आवश्यक आहे. वॉर्मअपशिवाय कोणताही व्यायाम करता कामा नये. व्यायाम करताना डिहायड्रेशन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अधूनमधून पाणी पीत राहावे. डिहायड्रेशन झाले तर रक्तदाब कमी होऊन चक्कर येऊन प्रसंगी जिवाला धोका उद्भवतो. आजारी असताना व्यायाम करणे टाळावे.
- डॉ. गणेश सपकाळ, हृदयरोगतज्ज्ञ.

Web Title: 20-year-old woman dies of heart attack after suddenly collapsing after exercising in gym

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.