२० रानडुक्करे वाहनात भरून निघाले विक्रीस मुंबई, नाशिककडे; पाठलाग करून तिघे पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:07 IST2025-04-28T13:05:31+5:302025-04-28T13:07:05+5:30
रानडुक्करांची तस्करी; छत्रपती संभाजीनगरात वन विभागाने पाठलाग करून तिघांना पकडले

२० रानडुक्करे वाहनात भरून निघाले विक्रीस मुंबई, नाशिककडे; पाठलाग करून तिघे पकडले
छत्रपती संभाजीनगर: परभणीवरून २० रानडुक्कर घेऊन मुंबई, नाशिकला विक्रीसाठी जाणाऱ्या तिघांना वनविभागाने पाठलाग करून रविवारी पहाटे पकडले.
पांढऱ्या रंगाचा मिनी टेम्पो (एम एच २२ ए एन ४३०७) केंब्रिज चौकातून संशयास्पदपणे वेगाने जाताना वनविभागाच्या गस्ती पथकाने पाहिले. वाहनातून एका डुकराचे तोंड बाहेर आल्याने पथकाचा संशय बळावला. वनपाल अविनाश राठोड, वनरक्षक एस.के. घुशिंगे, चालक आत्माराम तरटे यांना शंका आल्याने त्यांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता वाहनचालकाने वाहन सुसाट पळविणे सुरू केले. ते समृद्धी महामार्गाकडे जात असतांना पथकाने केंब्रिज ते कचरा पट्टी रोडवर पाठलाग करून १.३० वाजेच्या सुमारास पकडले. राजाराम गुंडीबा जाधव, कल्याण किसन बारहाते, धनराज शेषराव वंजारे यांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही रानडुकरे परभणीतील जंगलातून खरेदी करून ते नाशिक येथील मनोरा व मुंबईत तस्करी करीत असल्याचे आरोपींच्या सांगण्यावरून लक्षात आले.
हे मोठे रॅकेट असल्याचा संशय
पथकाने टेम्पो ताब्यात घेतला असून २० रानडुक्करांची सुटका केली. वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांनी पथक मुख्य वनसंरक्षक लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सहायक वनसंरक्षक आशा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाईसाठी नाशिक व मुंबईकडे रवाना केले आहे.
तिन्ही आरोपींना एफसीआर वन कोठडी
रानडुक्करांची तस्करी करणाऱ्या तिन्ही आरोपींना न्यायालयात उभे केले असता ३० एप्रिलपर्यंत वन कोठडी (एफसीआर) मिळाली . रानडुक्करांच्या तस्करीत कोणाकोणाचा सहभाग आहे?, किती दिवसांपासून ही तस्करी सुरू आहे याचा शोध वनविभाग घेत आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांनी सांगितले.