२ बीएचके फ्लॅट अन् जोडीला चारचाकी; नवरा पुण्याचाच हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 07:47 IST2025-11-01T07:47:33+5:302025-11-01T07:47:33+5:30
आई-वडील नसलेत तरी चालेल' या अपेक्षा आहेत आजच्या मॉडर्न मुलींच्या.

२ बीएचके फ्लॅट अन् जोडीला चारचाकी; नवरा पुण्याचाच हवा
प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : 'मुलगा पुण्यातला अन् आयटी पार्कमध्ये नोकरीला असावा. फार काही नको; पण एक २ बीएचके फ्लॅट अन् जोडीला चारचाकी थाट. गावाकडे घर आणि शेती. आई-वडील नसलेत तरी चालेल' या अपेक्षा आहेत आजच्या मॉडर्न मुलींच्या.
लग्नसराईला सुरुवात होत आहे. पूर्वी मुली स्थिर नोकरी, चांगले संस्कार आणि कुटुंबाकडे पाहून निर्णय घेत असत; मात्र आता त्यात 'पॅकेज', 'प्रॉपर्टी' आणि 'वर्क-लाइफ बॅलन्स' या शब्दांनी स्थान घेतले आहे.
सासूचा जाच नको
'लोकमत'ने प्रातिनिधिक स्तरावर 'यंदा कर्तव्य' असलेल्या तरुणींशी चर्चा केली. यावेळी विविध मुद्दे समोर आले. कोणाला आपल्यापेक्षा कर्तृत्ववान मुलगा वर म्हणून हवा आहे, तर कोणाला जमीनजुमला असलेला.
काहींनी तर चक्क सासूचा जाच नको म्हणून आई-वडील नसलेल्या मुलाला प्राधान्य असल्याचे सांगितले. मात्र, काहीजणी अजूनही साधेपणात समाधान शोधतात; पण त्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत. मॅट्रिमोनियल साइट्स आणि वधू-वर सूचक मंडळातील प्रोफाइल्सवरून हे स्पष्ट होते.
मी आयटी इंजिनिअर आहे. मला ८ लाखांचे पॅकेज मिळाले. होणाऱ्या नवऱ्याला माझ्यापेक्षा दुप्पट पगार असावा म्हणजे भविष्यात पुणे, मुंबईत घर घेताना आर्थिक गणित कोलमडू नये- चैताली वाघमारे
मुलाला केवळ नोकरी असणे पुरेसे नाही. स्वतःचा फ्लॅटही हवा. भविष्यात अडचण आलीच तर गावाकडे शेतीही असावी- श्रुती जाधव
मला एकत्रित कुटुंबपद्धती हवी. बाकी गोष्टी दोघे मिळून कमवूच शकतो- स्नेहल कोठाळे