नागरिकांच्या शिव्या, प्रचंड विरोध झुगारून छत्रपती संभाजीनगरात १८० अतिक्रमणे हटविली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:29 IST2025-03-25T13:27:39+5:302025-03-25T13:29:52+5:30
हर्सूल भागात महापालिकेची मोठी कारवाई

नागरिकांच्या शिव्या, प्रचंड विरोध झुगारून छत्रपती संभाजीनगरात १८० अतिक्रमणे हटविली!
छत्रपती संभाजीनगर : हर्सूल परिसरातील गट क्रमांक २१६ आणि २१७ येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गृह प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र येथील जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी अतिक्रमण केले होते. सोमवारी महापालिकेने पाेलिस बंदोबस्त रद्द झाल्यानंतरही कारवाईला सुरुवात केली. प्रारंभी नागरिकांनी मोहिमेला कडाडून विरोध दर्शविला. शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. मनपा अधिकाऱ्यांंनी सर्व विरोध झुगारून तब्बल १८० अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
पंतप्रधान आवास योजनेच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्याचा मुद्दा मागील एक वर्षांपासून गाजत होता. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाला वेळ मिळत नव्हता. अनेकदा पोलिस बंदोबस्ताअभावी मोहीम रद्द करावी लागली. चार दिवसांपूर्वीच मनपाने अतिक्रमण करणाऱ्यांना स्वत:हून अतिक्रमणे काढून घ्यावीत, असा इशारा दिला होता. सोमवारी (दि. २४) सकाळी १० वाजता मनपाचे पथक पोलिस बंदोबस्त नसतानाही दाखल झाले. पथक पाहून नागरिकांनी प्रचंड आक्रोश सुरू केला. मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंगावर नागरिक धावून जात होते. अधिकाऱ्यांनी नागरिकांची अनेकदा समजूत घालण्याचा प्रयत्न केला. नागरिक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे लक्षात आल्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पत्र्याचे शेड असलेली १८० लहान-मोठी अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली.
१५० जणांचा फौजफाटा
पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने महापालिकेने नागरी मित्र पथकाचे कर्मचारी, सफाई निरीक्षक, अग्निशमन जवान, आरोग्य विभागाच्या ॲम्ब्युलन्ससह १५० कर्मचारी तैनात केले होते. सकाळी १०.३० वाजता सुरू झालेली कारवाई दुपारी २.३० वाजता संपली.
कोणतीही कागदपत्रे नाहीत
शासकीय खुल्या जागेवर नागरिकांनी अनेक वर्षांपासून अतिक्रमण केले होते. त्यांच्याकडे जागेचे कोणतेही कागद नव्हते.मात्र, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, विजेचे मीटर आदी सोयीसुविधा त्यांना देण्यात आल्या होत्या.
आणखी काही पक्की घरे
१) सोमवारी केलेल्या कारवाईत गट क्रमांक २१६ येथील अतिक्रमणांवर कारवाई केली. गट क्रमांक २१७ मधील काही पक्की अतिक्रमणे काढायची बाकी असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.
२) बहुतांश नागरिकांकडे विजेचे मीटर होते. काही घरांमध्ये अंडरग्राउंड केबलद्वारे वीजपुरवठा देण्यात आला होता. हे दृश्य पाहून मनपा कर्मचाऱ्यांनाही नवल वाटले.
३) आज काढलेल्या अतिक्रमणांतील नागरिकांनी सांगितले की, आम्ही येथे २० ते २५ वर्षांपासून राहत आहोत.
चार किलो बाजरीसाठी धडपड
जेसीबीच्या साह्याने एकानंतर एक पत्र्याची घरे पाडण्यात येत होती. एका घरात चार किलो बाजरी होती. एक महिला ओरडली, किमान चार किलो बाजरी तरी काढून द्या... तिचा हंबरडा ऐकून नागरी मित्र पथकाच्या जवानांना पाझर फुटला. त्यांनी त्वरित चार किलोची पिशवी महिलेच्या हातात आणून दिल्यानंतर तिचे रडणे थांबले.
बाप-लेक आजारी
एका घरात बाप-लेक दोघेही गंभीर आजारी होते. मनपा अधिकाऱ्यांनी घरात जाऊन पाहणी केल्यानंतर दोघांना बाहेर काढले. त्यांना झाडाच्या सावलीमध्ये बसवले. त्यानंतर कारवाई केली.