छत्रपती संभाजीनगरात शटर उचकटून आयफोन, सॅमसंगसह ४० लाखांचे १६० मोबाइल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:25 IST2025-01-20T17:20:34+5:302025-01-20T17:25:01+5:30

प्रोझोन मॉलसमोरील घटना : महागड्या कंपन्यांचे १६० मोबाइल चोरीला

160 mobile phones worth Rs 40 lakhs, including iPhones and Samsungs, were looted after shutters were lifted in Chhatrapati Sambhaji Nagar | छत्रपती संभाजीनगरात शटर उचकटून आयफोन, सॅमसंगसह ४० लाखांचे १६० मोबाइल लंपास

छत्रपती संभाजीनगरात शटर उचकटून आयफोन, सॅमसंगसह ४० लाखांचे १६० मोबाइल लंपास

छत्रपती संभाजीनगर : प्रोझोन मॉलच्या समोर असलेल्या हनफिज मोबाइल कलेक्शनचे शटर उचकटून चोरट्यांनी महागड्या कंपन्यांचे १६० मोबाइल लंपास केले. या मोबाइलची किंमत ४० लाख ८८ हजार ८४८ रुपये एवढी होती. ही घटना १६ जानेवारीच्या रात्री घडली. याप्रकरणी १८ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

मोबाइल दुकानदार अब्रार जावेद हनफी (रा. जयसिंगपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे प्रोझोन मॉलसमोर हनफिज मोबाइल कलेक्शन आहे. १६ जानेवारीच्या रात्री १० वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. त्याच मध्यरात्री १२:३० वाजेनंतर एका विनाक्रमांकाच्या कारमधून चार चोरटे तेथे आले. त्यांनी मोबाइल कलेक्शनच्या शटरला कुलूप लावण्यासाठी असलेली लोखंडी पट्टी एक घाव घालून तोडली. त्यानंतर आतील काच फोडून दोन चोरटे घुसले आणि दोघे बाहेर थांबले. आत घुसलेल्या चोरांनी दुकानात डिस्प्लेवर लावलेले विविध कंपन्यांचे सुमारे १६० मोबाइल बॅग आणि बॉक्समध्ये भरले. यात १७.६७ लाखांचे ५२ सॅमसंग मोबाइल, ९.३७ लाखांचे ४६ विवो मोबाइल, ४.८३ लाखांचे ६ आयफोन, ५० हजार रुपयांचे २ मोटोरोला मोबाइल, २.२६ लाखांचे १६ ओप्पो मोबाइल, ६.२५ लाखांचे ३८ रेडमी मोबाइल, असे १६० मोबाइल लंपास केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडताना हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कैलास लहाने करीत आहेत.

घटना सीसीटीव्हीत कैद
मोबाइल शॉपीचे शटर अतिशय तकलादू हाेते. दोन चोरटे शटरजवळ आल्यानंतर कुलपाला लावण्यासाठी असलेली लोखंडी पट्टी घाव घालून तोडली. त्यानंतर दोन चोरटे दुकानात शिरले. त्यानंतर एक बॅगसह तीन खोक्यांमध्ये मोबाइल भरून चोरटे लंपास झाले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

-पांढऱ्या विनाक्रमांकाच्या कारमध्ये चोरटे आले.
-अवघ्या १५ मिनिटांत दुकान फोडून मोबाइल बॅगमध्ये घेऊन पसार झाले.
-हातात ठसे उमटू नये म्हणून चोरांनी हातात ग्लोव्हज घातले होते.
-मोबाइलच्या पावत्या व मोजदाद न झाल्याने तक्रारदाराने उशिरा तक्रार दिली व त्यामुळे उशिरा गुन्हा दाखल झाला.
 

Web Title: 160 mobile phones worth Rs 40 lakhs, including iPhones and Samsungs, were looted after shutters were lifted in Chhatrapati Sambhaji Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.