छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ हजार ब्रास वाळू पडून; मुदतवाढीचा निर्णय कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 19:24 IST2025-10-13T19:22:01+5:302025-10-13T19:24:15+5:30
शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे वाळू विक्रीबाबतच्या धोरणानुसार दोन वर्षांपूर्वी राज्यात २४७ वाळू डेपो निर्माण केले होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ हजार ब्रास वाळू पडून; मुदतवाढीचा निर्णय कागदावरच
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सहा वाळू डेपोंमध्ये जवळपास १६ हजार ब्रास वाळू निर्णयाअभावी पडून आहे. पावसाळी अधिवेशनात शासनाने नवीन वाळू धोरण लागू केलेले असताना जुन्या धोरणातील शिल्लक वाळूसाठी डेपोधारकांना महिन्याभराची मुदत वाढवून दिली होती. परंतु, गौण खनिज विभागाने दोन महिने झाले तरी अद्याप मुदतवाढीचे पत्र दिलेले नाही. परिणामी, ती वाळू डेपोतून गायब होण्याची शक्यता नाकारत येत नाही. गौणखनिज विभागाचे प्रभारी अधिकारी अनिल घनसावंत यावर खूप काही बोलण्यास तयार नाहीत.
शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे वाळू विक्रीबाबतच्या धोरणानुसार दोन वर्षांपूर्वी राज्यात २४७ वाळू डेपो निर्माण केले होते. कार्यकाळ संपल्यानंतर ते बंद केले. त्या धोरणांत अनेक अडचणी आल्याचे सांगत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डेपोचे ते धोरण बंद करीत नव्याने लिलावाची घोषणा केली. मात्र, डेपो धोरण रद्द केले तरी डेपोमधील शिल्लक वाळूचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी शिल्लक वाळू विक्री करण्यासाठी पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता.
संचिकांची टेबलवारी
मुदतवाढीची संचिका गौण खनिज विभागाकडून विधि विभागाकडे आणि विधि विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचली. परंतु, अद्याप त्या संचिकेवर स्वाक्षरी झालेली नाही. डेपोत वाळू असून, त्याची विक्री होत नसल्याने नागरिकांना परराज्यातील वाळू जादा दराने खरेदी करावी लागत आहे. तसेच अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक वाढली आहे.
डेपो सध्या उपलब्ध (वाळू ब्रास मध्ये )
गेवराई गुंगी.... २०१९
ब्रम्हगाव.... ३५९१
मोढा खु ...१०६२
डागपिंपळगाव... १४०८
बाभूळगाव गंगा ....१९८७
हिरडपुरी.... ६४२०
एकूण १६४८७