मविआच्या सभेसाठी १६ अटी, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी सभा

By राम शिनगारे | Updated: March 31, 2023 21:14 IST2023-03-31T21:05:56+5:302023-03-31T21:14:32+5:30

महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी (दि.२) सायंकाळी ५ वाजता जाहीर सभेचे आयोजन केले आहे.

16 conditions for Mavia's rally, rally will be held at ground of Marathwada Cultural Board | मविआच्या सभेसाठी १६ अटी, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी सभा

मविआच्या सभेसाठी १६ अटी, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी सभा

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या वतीने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी (दि.२) सायंकाळी ५ वाजता जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेला शहर पोलिसांनी १६ अटींच्या अधीन राहून परवानगी दिली. या परवानगीचे पत्र पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना दिले आहे.

महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात वज्रमूठ सभा घेण्यात येत आहेत. मराठवाड्यासाठीच सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर २ एप्रिल रोजी आयोजित केली आहे. त्याची तयारी मागील अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. गावागावांत जाऊन सभेला उपस्थित राहण्यासाठी विनंती केली जात आहे. शहरातील जाळपोळीच्या घटनेमुळे सभेला परवानगी देण्यात येते की नाही, याविषयी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र, पोलिस उपायुक्त गीते यांनी १६ अटीच्या अधीन राहून परवानगीचे पत्र आयोजकांना दिले आहे.

या आहेत अटी
सभेपूर्वी इतर शासकीय विभागाच्या परवानगी घेऊन त्याविषयीचे पत्र सिटीचौक पोलिसांना सादर करावे. सभा ५ ते ९.४५ या वेळेतच संपवावी. सभेच्या वेळी रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सभेत नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, हुल्लडबाजी करू नये. पोलिसांनी दिलेल्या मार्गावरूनच वाहने घेऊन जावीत, ठरविलेल्या ठिकाणीच वाहनांची पार्किंग करावी. सभेत कोणत्याही प्रकारचे शस्त्र आणू नये, त्याविषयीच्या सूचना संयोजकांनी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना द्याव्यात.

कार्यक्रमात स्वयंसेवक नेमावेत. सभेसाठी येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या कळवावी. सभेच्या ठिकाणच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक लोकांना बोलवू नये, सभास्थळी मजबूत बॅरिकेटस् लावावेत. ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जावे. उल्लंघन केल्यास आयोजकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई होईल. अत्यावश्यक सेवांना बाधा येणार नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Web Title: 16 conditions for Mavia's rally, rally will be held at ground of Marathwada Cultural Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.