कोईम्बतूरहून आणलेला १५ लाखांचा ब्रॅंडेड अंडरवेअर, ईलायचीचा माल ट्रक चालकाने केला गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 19:54 IST2024-10-09T19:46:46+5:302024-10-09T19:54:46+5:30
ट्रॉन्सपोर्ट कंपनीकडून ट्रकचालकासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल

कोईम्बतूरहून आणलेला १५ लाखांचा ब्रॅंडेड अंडरवेअर, ईलायचीचा माल ट्रक चालकाने केला गायब
वाळूज महानगर : ट्रॉन्सपोर्ट कंपनीचा एक ट्रक ज्यात सुमारे १५ लाखांचे अंडरवेअर आणि इलायचीच्या बॅगा भरलेल्या होत्या, तो माल परस्पर गायब केल्याप्रकरणी ट्रकचालक आणि त्याच्या साथीदाराविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी ट्रकचालक ओमकार विजयकुमार ढगे (रा. वडगाव, ता.जि. लातूर),गजानन बाबूराव केंद्रे (रा. वडगाव पोस्ट. हळी, पंढरपूर, जिल्हा लातूर)या दोघांना पोलिसांनी संशयावरून अटक केली आहे.
चैतन्य प्रकाश वाडकर (रा. ससेवाडी, ता. भोर, जि. पुणे) यांचा ट्रॉन्सपोर्टचा व्यवसाय आहेत. ५ ऑक्टोबरला तामिळनाडूतील कोईम्बतूर येथून ट्रक (एम.एच. १२, एस.एफ. ७५२४) मध्ये इलायची व अंडरवेअरचा माल भरून ट्रकचालक ओमकार ढगे व त्याचा साथीदार गजानन केंद्रे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले होते.
प्रवासादरम्यान या दोघांनी ट्रकच्या सेफ एक्स्प्रेस कंपनीचे सील तोडून ट्रकमधील १४ लाख ३८ हजार ५०० रुपये किमतीच्या इलायचीच्या ५० किलो वजनाच्या १२ बॅग, १४ हजार ८९६ रुपये किमतीच्या बोनस प्रीमियम, आरएन ९० कंपनीच्या १६० नग अंडरवेअर, १० हजार ५२८ रुपये किमतीचे सुप्रीम व्हाईट, आरएन -९० कंपनीचे १६० नग अंडरवेअर असा एकूण १४ लाख ६३ हजार ९२४ रुपये किमतीचा माल गायब केला. ट्रॉन्स्पोर्ट व्यावसायिक चैतन्य वाडकर यांना हे लक्षात येताच त्यांनी चौकशी केली. दोघांनी उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. या दोघांनीच माल गायब केल्याचा संशय व्यक्त करीत त्यांच्याविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर त्यांना अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय शितोळे करीत आहेत.