गौताळा अभयारण्यातील निरीक्षणात आढळले १५ पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:04 IST2020-11-12T13:03:23+5:302020-11-12T13:04:09+5:30
पक्षी सप्ताह : लालबुड्या, बुलबुल, साळुंकी, जंगली मैना, लहान तपकिरी होलाचे दर्शन

गौताळा अभयारण्यातील निरीक्षणात आढळले १५ पक्षी
औरंगाबाद : गौताळा अभयारण्यात पक्षी निरीक्षणात लालबुड्या, बुलबुल, साळुंकी, जंगली मैना, लहान तपकिरी होला, दयाळ, कोकिळा, पावशा, टकाचोर, भारद्वाज, माळटिटवी, वेडा राघू, कोतवाल, चिरक आदी १५ पक्ष्यांचे दर्शन झाले.
पक्षी सप्ताहानिमित्त गौताळा अभयारण्यात रविवारी पक्षी निरीक्षण उपक्रमात वन्यजीवचे विभागीय वन अधिकारी व्ही.एन. सातपुते, सहायक वनसंरक्षक राजेंद्र नाळे, सहायक वनसंरक्षक एस. पी. काळे, तसेच कन्नड व औरंगाबाद येथील स्थानिक नागरिक व ज्येष्ठ पत्रकार यांनी पक्षी निरीक्षणात सहभाग नोंदविला. पक्ष्यांची ओळख स्थानिक कर्मचाऱ्यांनी नागरिकांना करून दिली. पक्षी निरीक्षणादरम्यान रानडुक्कर, नीलगाय आढळली, तर बिबट्याची विष्टा दिसली. अभयारण्यातील दुर्मिळ औषधी, वनस्पतींची माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली. त्यात विविध आयुर्वेदिक कंदमुळे त्यात तांदूळ कंद, वराह कंद अशा आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती दिली.
९ प्रकारचे कोळी आणि १० प्रजातींची फुलपाखरे
९ प्रकारचे जंगलातील कोळी त्यात वूड स्पायडर, सिग्नेचर स्पायडर व १० प्रजातींची फुलपाखरे व ८ चतुराच्या प्रजातींची ओळख करून देण्यात आली. कन्नड वन्यजीवचे वनपरिक्षेत्र सहायक वन्यजीव आर. बी. शेळके, नागद वन्यजीव परिक्षेत्राचे सागर ढोले आणि दोन्ही परिक्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांमध्ये राजेंद्र भोसले, भास्कर पाटील, संजय मुचक, औरंगाबाद येथील रंजन देसाई, विसपुते आदींचा सहभाग होता.