छत्रपती संभाजीनगरात मुख्य जलवाहिनी फुटल्याने मध्यरात्री हाहाकार; दुकाने, घरांमध्ये पाणीच पाणी!
By मुजीब देवणीकर | Updated: June 10, 2024 17:25 IST2024-06-10T17:24:26+5:302024-06-10T17:25:13+5:30
ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली तेथील २५ पेक्षा अधिक दुकाने, आठ ते दहा अर्पाटमेंट, ३० ते ४० चारचाकी वाहनांसह घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले.

छत्रपती संभाजीनगरात मुख्य जलवाहिनी फुटल्याने मध्यरात्री हाहाकार; दुकाने, घरांमध्ये पाणीच पाणी!
छत्रपती संभाजीनगर : शहराला पाणीपुरवठा करणारी १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी रविवारी मध्यरात्री २:१० वाजता प्रेशर कमीजास्त झाल्यामुळे जालाननगर येथे फुटली. ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली तेथील २५ पेक्षा अधिक दुकाने, आठ ते दहा अर्पाटमेंट, ३० ते ४० चारचाकी वाहनांसह घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे कळताच व्यापारी मध्यरात्री भरपावसात धावून आले. तेव्हापर्यंत होत्याचे नव्हते झाले होते. मोटारी लावून सकाळपर्यंत पाण्याचा उपसा केला. दुकाने उघडल्यावर काही व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी होते. घटनेच्या तब्बल १२ तासानंतर मनपाने जलवाहिनी दुरूस्तीचे काम सुरू केले. व्यापारी, नागरिकांनी काम सुरू करण्यास विरोध दर्शविला. अगोदर नुकसान भरपाई द्या, मगच काम सुरू केला. मनपाने पोलीसांना मदतीसाठी बोलावून घेतले. त्यानंतर काम सुरू झाले.