मराठवाड्यातील १२५४ झेएडपी शाळांची बत्ती ‘गूल’; विद्यार्थ्यांचे शिक्षण अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 13:12 IST2021-12-23T13:10:51+5:302021-12-23T13:12:04+5:30
महावितरणकडून कारवाई, वीज बिलाची थकबाकी ३.४७ कोटी रुपये

मराठवाड्यातील १२५४ झेएडपी शाळांची बत्ती ‘गूल’; विद्यार्थ्यांचे शिक्षण अंधारात
औरंगाबाद : वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य ग्राहकांबरोबर पथदिवे, पाणीपुरवठ्याची वीज तोडण्याची कारवाई करण्यात आली. महावितरणने आता थकीत वीज बिलामुळे मराठवाड्यातील तब्बल १,२५४ जि. प. शाळांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या ५ हजार २७९ शाळा आहेत. या शाळांकडे वीज बिलापोटी ९ कोटी ८२ लाख रुपयांची थकबाकी आहे. यातील १,२५४ शाळांची महावितरणने तात्पुरती वीज खंडित केली असून, त्यांच्याकडे ३ कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी आहे. बिलाचा भरणा केल्यानंतरच वीजपुरवठा सुरळीत करण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण सध्या अंधारातच सुरू आहे.
वीजपुरवठा खंडित झालेल्या शाळांमध्ये औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या औरंगाबाद परिमंडळातील ४०९ शाळा आहेत. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर परिमंडळातील ४८५ शाळा आहेत, तर हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नांदेड परिमंडळातील ३६० शाळांचा समावेश आहेत.
वारंवार सूचना
वीज बिलाच्या थकबाकीसाठी काही जि. प. शाळांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यांना थकीत वीज बिलासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. थकीत वीज बिल भरल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. उर्वरित थकबाकीदार शाळांनीही वीज बिल भरावे.
- डॉ. मंगेश गोंदावले, सहव्यवस्थापकीय संचालक, औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय महावितरण