दहावीच्या विद्यार्थ्याचा कोचिंग क्लासमधील मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 17:45 IST2019-01-12T17:44:02+5:302019-01-12T17:45:43+5:30
या घटनेनंतर गंभीर जखमी विद्यार्थ्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दहावीच्या विद्यार्थ्याचा कोचिंग क्लासमधील मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला
औरंगाबाद: जुन्या भांडणाच्या कारणावरून दहावीच्या एका विद्यार्थ्याला खाजगी शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांने धारदार शस्त्राने दोनदा भोसकून गंभीर जखमी केले. ही खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी साडेचार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास दशमेशनगर रस्त्यावरील चाटे कोचिंग क्लासेसमध्ये घडली. या घटनेनंतर गंभीर जखमी विद्यार्थ्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गणेश सुनील काळे (वय १६,रा.श्रीकृष्णनगर, उल्कानगरी,मूळ रा. बोरगाव अर्ज, ता. फुलंब्री)असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. याविषयी जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, गणेश हा जयभवानी शाळेत दहावीमध्ये शिकतो तर दशमेशनगर येथील चाटे कोचिंग क्लासमध्ये त्याची शिकवणी आहे. त्याच्याच क्लासमध्ये असलेल्या राजेश (नाव बदलले) सोबत त्याचे गेल्या काही दिवसापासून किरकोळ स्वरूपाचे भांडण होत असते. या वादातून चार ते पाच दिवसापूर्वी राजेशने सोबत हाणामारी झाली होती. त्यावेळी लोकांनी भांडण सोडविले होते. तेव्हा राजेशने गणेशला पाहून घेईन अशी धमकी दिली होती.
११ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता गणेश हा नेहमीप्रमाणे कोचिंग क्लासला गेला. पावणेपाच वाजेच्या सुमारास त्याला क्लासमधील एका शिक्षकाला भेटून तो पाणी पिण्यासाठी जात असताना मागून आलेल्या राजेशने त्याला शिवीगाळ करून कटरसारख्या धारदार शस्त्राने पाठीवर पहिला वार केला. त्यावेळी मला मारू नको, असे गणेश ओरडल्यानंतरही राजेशने पुन्हा दुसरा वार केला. गणेशच्या ओरडण्याच्या आवाजाने शिक्षकासह अन्य विद्यार्थी वर्गाबाहेर आल्याने राजेश क्लासमधून बाहेरच्या दिशेने पळून गेला. त्याला पकडण्यासाठी काही विद्यार्थी धावले,मात्र तो मित्राच्या मोटारसायकलवर मागे बसून तेथून पळून गेला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गणेशला शिक्षकांनी तातडीने क्लासेसपासून जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.