'१०० टक्के नुकसान अमान्य'; पीकविमा देण्यात कंपन्यांनी घातला तांत्रिक खोडा

By विकास राऊत | Published: October 27, 2023 12:03 PM2023-10-27T12:03:05+5:302023-10-27T12:04:52+5:30

मंडळनिहाय पाऊस, उत्पादनांच्या निकषावर बोट ठेवत कंपन्यांनी घातला खोडा 

'100 percent loss invalid'; Technical trick played by companies in providing crop insurance | '१०० टक्के नुकसान अमान्य'; पीकविमा देण्यात कंपन्यांनी घातला तांत्रिक खोडा

'१०० टक्के नुकसान अमान्य'; पीकविमा देण्यात कंपन्यांनी घातला तांत्रिक खोडा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के विम्याची रक्कम देण्याआधीच मंडळनिहाय पाऊस, पीक उत्पादन, नुकसान आदी निकषांचा तांत्रिक खोडा विमा कंपन्यांनी घातला आहे. बीड सोडून इतर जिल्ह्यांत पाऊस आणि उत्पादन यावरून विमा कंपन्यांनी विश्लेषणाची भूमिका घेतली आहे. परिणामी दिवाळीपूर्वी हा तांत्रिक तंटा सुटला नाही तर शेतकऱ्यांना २५ टक्के विम्याची रक्कम मिळणे अवघड होणार आहे. बीड जिल्ह्यातील ८६ मंडळातील पाऊस आणि उत्पादनांच्या निकषाचे प्रकरण राज्य तांत्रिक सल्लागार समितीने निकाली काढले आहे.

दिवाळी १५ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना कंपन्यांनी अजून काहीही हालचाल न केल्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार नाही. असे चित्र सध्या तरी आहे. शासनाकडे याबाबत निर्णय होईल, असे प्रशासन सांगत आहे.

१०० टक्के नुकसान अमान्य
१०० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल कंपन्या स्वीकारण्यास तयार नाही. मंडळनिहाय पावसाचा खंड हे देखील कंपन्यांना मान्य नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना यामध्ये भूमिका घ्यावी लागणार आहे. काही कंपन्यांनी पिकांनुसार देखील विमा देण्याचे निकष ठरविले आहेत. त्यात सोयाबीन, कापूस, बाजरीला विमा मिळणार नाही. १०० टक्के नुकसान, शून्य टक्के उत्पादन असे होतच नसते. ६२ टक्के नुकसान कंपन्या स्वीकारण्यास तयार आहेत. ३ आठवडे पावसाचा खंड ही कंपन्या गृहीत धरणार आहेत. निकषात बसणाऱ्यांना दिवाळीपूर्वी विमा मिळेल. असे कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

कसा गेला यंदाचा पावसाळा ?
कापूस, मका, सोयाबीन पेरणी : ४० लाख हेक्टर
विमा काढला : ८१ लाख ११ हजार ३७४ शेतकऱ्यांनी
विमा संरक्षित रक्कम : २३ हजार ७७६ कोटी ६६ लाख
ऑगस्ट : महिना पूर्णत: कोरडा
२१ दिवसांपेक्षा अधिक खंड : २५० मंडळांत

किती दिवस पाऊस : १२२ पैकी ४० दिवस
आठ जिल्ह्यात किती पाऊस? : ८५.५ टक्के
किती पावसाची तूट : १५ टक्के
वार्षिक सरासरी : ६७९.५ मिमी.
किती पाऊस झाला? : ५८१.५ मिमी.
मागील वर्षीचा पाऊस : ७६९.७ मिमी. (११३ टक्के)

विम्यासाठी अर्ज केलेले शेतकरी
जिल्हा..........अर्जदार शेतकरी

छत्रपती संभाजीनगर : ११५०८४४
जालना : १०१५९३२
बीड : १८५०५५२
लातूर : ८६३०१७
धाराशिव : ७५७७७१
नांदेड : ११९७७४४
परभणी : ७६३०७६
हिंगोली : ५१२४४७
एकूण : ८१११३७४

काय म्हणाले विभागीय आयुक्त ?
मराठवाड्यात २५० मंडळांत पावसाचा खंड होता. तेथे २५ टक्के अग्रीम विम्याची रक्कम देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले होते. परंतु प्रीमियम न भरल्याची, उत्पादन, मंडळनिहाय पावसाचे निकषांची अडचण असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. शासन यामध्ये निर्णय घेईल.
-मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त

कोणत्या कंपन्यांकडे जबाबदारी?
छत्रपती संभाजीनगर : चाेलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कं.लि., जालना : युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं.लि., बीड : भारतीय कृषी विमा कंपनी, लातूर : एसबीआय जनरल इन्शुरन्स कं.लि., धाराशिव : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि., परभणी : आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि., नांदेड : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि., हिंगोली : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि. या कंपन्यांकडे विमा रक्कम देण्याची जबाबदारी आहे.

Web Title: '100 percent loss invalid'; Technical trick played by companies in providing crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.