हुंडाबळीच्या आरोपाखाली पतीला दहा वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:16 IST2019-01-29T23:16:15+5:302019-01-29T23:16:50+5:30
हुंड्याची राहिलेली रक्कम न दिल्याने पती व सासूने दिलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. सत्र न्यायाधीश एस.डी. दिग्रसकर यांनी मंगळवारी (दि. २९) आरोपी पती पुंजाराम विठ्ठलराव मुळे (३२, रा. सटाणा, ता. जि. औरंगाबाद) याला १० वर्षे सश्रम कारावास आणि विविध कलमांखाली एकूण दीड हजार रुपये दंड ठोठावला.

हुंडाबळीच्या आरोपाखाली पतीला दहा वर्षे सश्रम कारावास
औरंगाबाद : हुंड्याची राहिलेली रक्कम न दिल्याने पती व सासूने दिलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. सत्र न्यायाधीश एस.डी. दिग्रसकर यांनी मंगळवारी (दि. २९) आरोपी पती पुंजाराम विठ्ठलराव मुळे (३२, रा. सटाणा, ता. जि. औरंगाबाद) याला १० वर्षे सश्रम कारावास आणि विविध कलमांखाली एकूण दीड हजार रुपये दंड ठोठावला.
विवाहिता भाग्यश्री पुंजाराम मुळे (२०, रा. सटाणा) हिने मृत्यूपूर्व जबाब दिला होता की, १ एप्रिल २००८ ला तिचे लग्न आरोपी पुंजाराम याच्याशी झाले होते. लग्नात एक लाख ११ हजार रुपये हुंडा व लग्न लावून देण्याचे ठरले होते. त्यानुसार भाग्यश्रीच्या वडिलांनी एक लाख रुपये दिले व लग्न लावून दिले. दोन महिने चांगले वागविल्यानंतर आरोपी पुंजाराम व सासू रुक्मिणीबाई हुंड्याच्या उर्वरित ११ हजार रुपयांसाठी भाग्यश्रीचा शारीरिक व मानसिक छळ करीत असत.
१६ एप्रिल २०१० रोजीसुद्धा आरोपींनी ११ हजार रुपये आणावेत असा तगादा लावत भाग्यश्रीला मारहाण केली. नेहमीच्या त्रासाला कंटाळून रागाच्या भरात भाग्यश्रीने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. आग विझविताना आरोपी पुंजारामचा हातदेखील भाजला. भाग्यश्रीला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. तेथे पोलीस व तत्कालीन नायब तहसीलदार डी. एन. भारस्कर यांनी भाग्यश्रीचा जबाब नोंदविला. उपचारादरम्यान २७ एप्रिल २०१० रोजी भाग्यश्रीचा मृत्यू झाला. करमाड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान रुक्मिणीबाई मुळे हिचा मृत्यू झाला. सहायक लोकाभियोक्ता बी.आर. लोया यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात भाग्यश्रीचा मृत्यूपूर्व जबाब महत्त्वाचा ठरला. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी पतीला ‘हुंडाबळी’च्या आरोपाखाली भादंवि कलम ३०४ (ब) अन्वये १० वर्षे सश्रम कारावास , ‘शारीरिक व मानसिक छळा’च्या आरोपाखाली कलम ४९८ (अ) अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड, ‘मारहाणी’च्या आरोपाखाली कलम ३२३ अन्वये ६ महिने साधी कैद व ५०० रुपये दंड, अपमान करण्याच्या आरोपाखाली कलम ५०४ अन्वये ६ महिने साधी कैद आणि ५०० रुपये दंड ठोठावला.