औरंगाबादमध्ये स्वाईन फ्लूचे दहा रुग्ण; उपचार घेणारे बहुतांश रुग्ण अन्य जिल्ह्यांतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 17:28 IST2018-10-03T17:27:17+5:302018-10-03T17:28:04+5:30
शहरात उपचार घेणारे बहुतांश रुग्ण अन्य जिल्ह्यांतील असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयातर्फे देण्यात आली.

औरंगाबादमध्ये स्वाईन फ्लूचे दहा रुग्ण; उपचार घेणारे बहुतांश रुग्ण अन्य जिल्ह्यांतील
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) स्वाईन फ्लू वॉर्डामध्ये ४ रुग्ण दाखल असून, त्याचवेळी शहरातील विविध खाजगी रुग्णालयांत ६ रुग्ण दाखल आहेत. शहरात उपचार घेणारे बहुतांश रुग्ण अन्य जिल्ह्यांतील असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयातर्फे देण्यात आली.
शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बुलडाणा येथील ४८ वर्षीय एका स्वाईन फ्लू रुग्णाचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. याच रुग्णालयात आणखी तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याबरोबरच अन्य रुग्णालयांत तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर घाटीतील स्वाईन फ्लू वॉर्डातही चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. घाटीतील रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली.
‘स्वाईन फ्लू’चा प्रभाव पावसाळ्यात, तसेच हिवाळ्यात सर्वाधिक दिसून येत असे; परंतु यंदा उन्हाळ्यातही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले. हे रुग्णही बाहेरचे होते. शहरात सध्या उपचार सुरूअसलेल्या १० पैकी केवळ एकच रुग्ण शहरातील असल्याचे आरोग्य उपसंचालक कार्यालयातर्फे सांगण्यात आले.