पूर्व पत्नीला भेटायला आलेल्या तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या
By परिमल डोहणे | Updated: December 5, 2025 23:57 IST2025-12-05T23:57:12+5:302025-12-05T23:57:46+5:30
राजुरा तालुक्यातील हरदोना येथील घटना : दीड तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या

पूर्व पत्नीला भेटायला आलेल्या तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या
परिमल डोहणे, चंद्रपूर : आपल्या पूर्व पत्नीला भेटायला आलेल्या तरुणाची तिच्या पतीने धारदार तलवारीने हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास राजुरा तालुक्यातील हरदोणा येथे घडली. राजेश नारायणलाल मेधवानी (४०) राहणार बीलवाडा राजस्थान असे मृतकाचे नाव आहे. राजुरा पोलिसांनी अवघ्या दीड तासात हत्येचा छडा लावून चंद्रप्रकाश मेघवंशी यास ताब्यात घेतले आहे.
राजेश मेधवानी याच्या पत्नीने त्याला सोडून चंद्रप्रकाश मेघवंशी याच्याशी काही महिन्यापूर्वी विवाह केला. ते दोघेही राजुरा तालुक्यातील हरदोना येथे वास्तव्यास होते. शुक्रवारी राजेश मेधवानी आपल्या पूर्व पत्नीला भेटायला हरदोनी येथे आला. मात्र यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला. दरम्यान राजेशची तलवारीने हत्या करण्यात आली. राजुराचे ठाणेदार सुमित परतेकी यांनी वेळीच आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून चंद्रप्रकाश मेघवंशी यास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.
हत्या करून पसार झाल्याचा केला बनाव
राजेशला रक्ताच्या थारोळ्यात सोडून काही माहितच नाही या आविर्भावात मेघवंशी होते. घरमालकाने याबाबतची माहिती राजुरा पोलिसांना दिली. ठाणेदार परतेकी यांची चमू घटनास्थळी गेली असता कुणीतरी मारून पसार झाले असे सांगितले. पोलिस त्याच्या मागावर लागले मात्र ठाणेदार परतेकी यांना बयान घेताना त्यांच्यावर संशय त्यावरून त्यांनी चंद्रप्रकाश मेघवंशी याला ताब्यात घेतल्याची माहिती ठाणेदार परतेकी यांनी दिली.