युद्धाचे पडसाद ! तांदूळ निर्यात ठप्प, धानाच्या भावात घसरण; शेतकरी दुहेरी संकटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:00 IST2026-03-11T12:53:02+5:302026-03-11T13:00:52+5:30
Chandrapur : आखाती देशांमधील युद्धाचे पडसाद आता भारतातील तांदूळ व्यापारावर उमटू लागले आहेत. निर्यात साखळी विस्कळीत झाल्याने कोट्यवधी रुपयांच्या तांदळाची निर्यात ठप्प झाली आहे.

War's repercussions! Rice exports halted, paddy prices fall; Farmers in double trouble
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आखाती देशांमधील युद्धाचे पडसाद आता भारतातील तांदूळ व्यापारावर उमटू लागले आहेत. निर्यात साखळी विस्कळीत झाल्याने कोट्यवधी रुपयांच्या तांदळाची निर्यात ठप्प झाली आहे. गेल्या आठवडाभरात एकही कंटेनर निर्यातीसाठी रवाना झाला नसल्याची माहिती आहे. निर्यात बंद पडल्याने राइस मिल आणि गोदामांमध्ये तांदळाची पोती पडून असून, त्याचा थेट फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. बाजारात धानाचा प्रतिक्विंटल भाव २ हजार ३०० रुपयांवरून सुमारे २ हजार रुपयांपर्यंत घसरला असून, यात आणखी घसरण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
निर्यात ठप्प झाल्यामुळे गुजरातमधील बंदरे, मुंबईतील जे. एन. पोर्ट तसेच कोलकाता पोर्ट येथे हजारो क्विंटल तांदूळ तसाच पडून आहे. समुद्रमार्गे होणारी निर्यात मंदावल्याने निर्यातदारांनी खरेदी थांबवली असून व्यापारीही सावध झाले आहेत. ब्रह्मपुरी परिसरातील सहा राइस मिलमधून दररोज सरासरी पाच कंटेनर तांदूळ निर्यातीसाठी पाठविला जात होता. एका कंटेनरमध्ये सुमारे २७ टन तांदूळ यानुसार दररोज सुमारे १३५ टन तांदळाची निर्यात होत होती. हा तांदूळ प्रामुख्याने सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, रशिया तसेच इतर देशांमध्ये पाठविला जात असे. आखाती देशांमध्ये युद्ध भडकताच समुद्री मार्गावरील वाहतूक व निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आणि निर्यातीची साखळीच खंडित झाली. निर्यातदारांकडून खरेदी थांबली. व्यापाऱ्यांकडे तांदूळ साठून राहिल्यामुळे शेतकऱ्यांकडून धानखरेदीही मंदावली आहे.
बासमती तांदूळ व आयआर ६०/४० धानावर मंदी
इराण हा बासमती तांदळाचा मोठा आयातदार देश असून तेथील आहारात बासमती तांदळाला विशेष महत्त्व आहे. युद्धामुळे इराणकडे जाणारी निर्यात थांबल्याने बासमती तांदळाच्या किमतीत प्रतिक्विंटल सुमारे ५०० रुपयांची घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. चंद्रपूरसह विदर्भात मोठ्या प्रमाणावर लागवड होणाऱ्या आयआर ६०/४० या धानालाही या परिस्थितीचा फटका बसला आहे. निर्यात मंदावल्यामुळे या धानाच्या तांदळाच्च्या किमतीत सुमारे ३०० रुपयांची घट झाली आहे.
शासकीय खरेदी केंद्रांमध्ये ऑनलाइन नोंदणी झालेल्या धानाचे पैसेही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांत अद्यापि जमा झालेले नाहीत. एकीकडे बाजारातील दर घसरलेले आणि दुसरीकडे शासकीय देयकांमध्ये विलंब, अशा दुहेरी संकटात शेतकरी आहेत.
"युद्धामुळे सध्याच्या परिस्थितीत व्यापारी धान खरेदी करण्यास तयार नाहीत. निर्यातदारांकडून मागणी थांबल्याने बाजारात मंदी आली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत आहे."
- प्रशांत उराडे, संचालक, साई प्रोडक्शन