पश्चिम चांदा, मध्य चांदा, ब्रह्मपुरी क्षेत्र : वन्यप्राण्यांचे उत्कृष्ट संरक्षणाचा अधिकाऱ्यांचा दावा लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) पश्चिम चांदा, मध्य चांदा व ब्रह्मपुरी असे तीन वनप्रकल्प आहेत. या तिन्ही प्रकल्पांत वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. वन्यप्राण्यांच्या उत्कृष्ट संरक्षणामुळे हे शक्य झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना नगण्य स्वरूपात घडल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वनविकास महामंडळाचे ८५१८५.२८३ हेक्टर एवढे क्षेत्र आहे. यात पश्चिम चांदा वनप्रकल्प विभागाचे एकूण क्षेत्र २३९३७.९१० हेक्टर, मध्यचांदा वनप्रकल्प विभागाचे एकूण क्षेत्र ३११३४.६३२ हेक्टर व ब्रह्मपुरी वनप्रकल्प विभागाचे एकूण क्षेत्र ३०१३२.७४१ हेक्टर इतके आहे. विविध योजनेतंर्गत कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राणी गावांकडे येत नाही. या प्रदेशातील जुनोना, डोंगरहळदी, पोंभूर्णा, कन्हाळगाव, बाळापूर, सिंदेवाही या भागात वन्यप्राणी मोठ्या संख्येत आहेत. पाणवठ्याजवळ मचाण तयार करून त्यावर दिवस-रात्र निगराणी ठेवली जाते. तसेच ज्या क्षेत्रात वाघ, बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात आहे, त्या ठिकाणी ठळक फलक लावून गावकऱ्यांना तेथे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वनविकास महामंडळाच्या क्षेत्रात निष्कासन, रोपवन यासारखी कामे नेहमी सुरू असतात. त्यामुळे वनकर्मचारी नेहमी जंगलात जात असतात. तसेच दिवस-रात्र कर्मचाऱ्यांची गस्त सुरू आहे. त्यामुळे वनविकास महामंडळाच्या क्षेत्रात वाघ किंवा इतर वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडलेल्या नाही. तसेच मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटनासुद्धा या वर्षात कमी प्रमाणात आहेत. वन्यप्राण्यांच्या संख्येतसुद्धा वाढ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सन २०१७ मध्ये बुद्धपौर्णिमेच्या दिवशी १० ते ११ मे या कालावधीत उत्तर चंद्रपूर प्रदेशातंर्गत पश्चिम चांदा, मध्यचांदा व ब्रह्मपुरी वनप्रकल्प विभागातील एकूण ६० पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक पाणवठ्यावर एक कर्मचारी व एक स्वयंसेवी संस्थेचे सदस्य नेमण्यात आले होते. स्वयंसेवी संस्थेच्या ११ सदस्यांनी या कार्यक्र्रमात भाग घेतला. उत्तर चंद्रपूर प्रदेशातील तिन्ही विभागांत एकूण ९ वाघ, २ बिबटे, २१ अस्वल, ६२ रानकुत्रे, १०५ रानगवे, ४७७ चितळ, ७१ सांबर, १५५ नीलगायी आढळून आल्या. इतर बरेच प्राणीसुद्धा पाणवठ्यांवर आल्याची माहिती आहे.
एफडीसीएममध्ये वाघ वाढले
By admin | Updated: May 19, 2017 01:18 IST