Chandrapur Tiger Attack: वाघाने घेतला शेतकऱ्याचा जीव; गुरे-ढोरेही असुरक्षित, गोंडपिपरी तालुक्यात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:19 IST2025-10-20T14:16:53+5:302025-10-20T14:19:17+5:30
Chandrapur Tiger Attack: गोंडपिपरी तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून विविध गावांमध्ये वाघाचा संचार असून, शेतशिवारात पाऊलखुणा मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.

Tiger takes farmer's life; cattle also unsafe, atmosphere of fear in Gondpipri taluka
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी (चंद्रपूर) : गोंडपिपरी तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्रातील चेकपिपरी शेतशिवारात शनिवारी (दि. १८) वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला. भाऊजी पत्रू पाल (७०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
भाऊजी पाल हे शेतातील बैल आणण्यासाठी शनिवारी दुपारी ३ वाजता शेतात गेले. सायंकाळ होऊनदेखील भाऊजी बैल घेऊन घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजारी व गावकऱ्यांनी सायंकाळी शेतात जाऊन बघितले असता बैलजोडी शेतात बांधून होती. मात्र, भाऊजी पाल यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अंधार असल्याने गावकऱ्यांनी बैल घरी आणले. सकाळी पुन्हा शोध घेतला असता, वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या भाऊजींचा मृतदेहच आढळला. त्यांच्या पश्चात पत्नी व मोठा आप्त परिवार आहे.
गावकऱ्यांनी त्वरित वन विभागाला कळवले. वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकार, क्षेत्र सहायक पुरी, बीटगार्ड दत्ता, निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दीपक वांढरे घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी मृताच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये रोख रक्कम देऊन मदत केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.