शेतकरी किडनी विक्री प्रकरणात थरारक खुलासे ! पीडितच बनले एजन्ट, आणखी एकाला चंडीगडमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:55 IST2025-12-25T15:50:31+5:302025-12-25T15:55:06+5:30
Chandrapur : रामकृष्ण सुंचू उर्फ कथित डॉ. क्रिष्णासह किडनी विक्रीतील दुसऱ्या एजंटला स्थानिक गुन्हे शाखा व एसआयटीच्या पथकाने मंगळवारी (दि. २३ रोजी) रात्री चंदीगड येथील मोहालीतून अटक करण्यात आली आहे.

Thrilling revelations in farmer kidney sale case! Victim turned agent, another arrested from Chandigarh
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रामकृष्ण सुंचू उर्फ कथित डॉ. क्रिष्णासह किडनी विक्रीतील दुसऱ्या एजंटला स्थानिक गुन्हे शाखा व एसआयटीच्या पथकाने मंगळवारी (दि. २३ रोजी) रात्री चंदीगड येथील मोहालीतून अटक करण्यात आली आहे. हिमांशू भारद्वाज (३०) असे त्याचे नाव असून, त्याचीसुद्धा किडनी काढली असल्याचे तपासात सामोर आले आहे. बुधवारी ब्रह्मपुरी न्यायालयाने त्याची दि. २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
रामकृष्णच्या माध्यमातून व रोशनसह किडनी विक्रीसाठी कंबोडियात गेलेले युवक राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार येथील असल्याचे समोर आले आहे. यावेळी दोन जणांची ओळख एसआयटी पथकाला पटली होती. त्याच्या तपासासाठी वेगवेगळी पथके रवाना झाली होती. दरम्यान, हिमांशूला अटक करण्यात यश आले आहे, तर पश्चिम बंगालमधील दुसऱ्या आरोपीच्या घरी पोलिस पोहचले होते. मात्र, त्याचा जुळा भाऊ निघाला. त्या आरोपीच्या मागावरच पोलिस पथक आहे.
तिसरा आरोपी अभियंता अन् बायको वकील
बंगाल येथील असलेल्या तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पथक बंगालमध्ये ठाण मांडून आहे. विशेष म्हणजे तोसुद्धा अभियंता आहे, तर त्याची बायको वकील आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात कायदेशीर अडचण जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
केअरटेकरची भूमिका
हिमांशू भारद्वाज हा रोशन कुळेसोबत कंबोडियाला होता. यावेळी ज्यांची किडनी काढली, त्या सर्वांच्या केअरटेकरच्या भूमिकेत तो होता.
भारतातून कंबोडियात नेणे तेथून परत आणणे तसेच रुग्णालयात त्यांची सुश्रुषा करणे, ही कामे तो करत होता. एवढेच नाही तर किडनी डोनर हा ग्रुपसुद्धा हिमांशूच चंदीगड येथून चालवत असल्याची माहिती पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले.
'त्या' लॅबमधील कागदपत्रे उलगडणार रहस्य
कोलकाता येथील एक पॅथॉलॉजीमध्ये किडनी काढण्यापूर्वी सर्वांची तपासणी करण्यात आली. त्या सर्वांची कागदपत्रे या पॅथॉलॉजीत आहेत. ही सर्व कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
रोशन कुळेंची किडनी ९ हजार अमेरिकन डॉलरमध्ये ?
मिंथूरच्या रोशन कुळे याचे मूत्रपिंड चीन येथील रुग्णाला ९ हजार अमेरिकन डॉलरमध्ये विकल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही.
सहावा फरार सावकार पोलिसांना शरण
या प्रकरणात फरार असलेला मनीष पुरुषोत्तम घाटबांधे हा सावकार याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने बुधवारी सायंकाळी पोलिसांना शरण आला आहे.