लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीत अवघ्या एका मताने झालेला काँग्रेसचा पराभव हा केवळ अंकगणिताचा नव्हे, तर वेळेवर निर्णय न घेण्याचा परिणाम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेषतः वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांबाबत सुरुवातीला सकारात्मक भूमिका घेतली असती, तर काँग्रेसला सत्तास्थापनेत अडचण आली नसती, असा सूर उमटत आहे.
निवडणुकीनंतर काँग्रेसकडे २७नगरसेवक होते. प्रहार जनसेना (भाशेकाप) चे तीन, एमआयएमचा एक (भाशेकाप गटात सहभागी) आणि बसपची एक नगरसेविका यांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ ३२ वर गेले होते. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमताच्या जवळ काँग्रेस पोहोचली होती.
दरम्यान, १६ जानेवारीला निकाल लागल्यानंतर वंचितचे दोन नगरसेवक काँग्रेससोबत जाण्यास इच्छुक असल्याची माहिती पुढे आली. त्यांनी काँग्रेस नेत्यांशी संपर्कही साधल्याचे सांगितले जाते. मात्र, उद्धवसेनेसोबत युती करून निवडणूक लढल्याच्या कारणावरून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याच टप्प्यावर काँग्रेसने राजकीय लवचिकता दाखवून या दोन सदस्यांना आपल्या गटात सामावून घेतले असते, तर पुढील सत्तासमीकरण अधिक स्थिर झाले असते.
पुढे हेच दोन सदस्य उद्धवसेना गटात सहभागी झाले. महापौर निवडणुकीच्या दिवशी वंचितचे दोन्ही नगरसेवक गैरहजर राहिल्याने काँग्रेसची मतसंख्या ३१ वरच राहिली, तर भाजपला ३२ मते मिळाली. एका मताने सत्ता हातातून गेल्याने सुरुवातीच्या दुर्लक्षाची किंमत काँग्रेसला मोजावी लागल्याचे स्पष्ट झाले.
"निकाल लागताच काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधला. प्रतिसादच मिळाला नाही. नगरसेवकांनीही त्यांच्याकडेच आधी धाव घेतली होती. त्यांचाही थारा लागला नाही. उद्धवसेनेने शेवटच्या दिवशी वेगळी भूमिका घेतली. हे कळताच नगरसेवकांशी संपर्क साधला असता दोघांचेही मोबाइल स्विच ऑफ होते. पुढे जे घडले सर्वांसमक्ष आहेच."- स्नेहल रामटेके, तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, चंद्रपूर.
Web Summary : Congress's defeat in Chandrapur mayoral election stemmed from delayed decisions. Ignoring Vanchit Bahujan Aghadi's initial support proved costly. Failure to embrace Vanchit's councilors led to a missed opportunity, ultimately handing victory to BJP.
Web Summary : चंद्रपुर महापौर चुनाव में कांग्रेस की हार का कारण निर्णय लेने में देरी थी। वंचित बहुजन अघाड़ी के शुरुआती समर्थन को नजरअंदाज करना महंगा साबित हुआ। वंचित के पार्षदों को शामिल करने में विफलता से अवसर चूक गया, जिससे अंततः भाजपा को जीत मिली।