घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातील रब्बी हंगाम आता शेतकऱ्यांच्या हातात आला आहे. मात्र, यावर्षी धानासारखेच कठाण मालांचेही दर चांगलेच घसरले आहेत. परिणामी, कठाण धान्य विक्रीसाठी उत्सुक असलेले शेतकरी विवंचनेत सापडले आहेत.
तालुक्याचे मुख्य पीक धानाचे आहे. या पिकावरच या तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात येते. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावाने धानाची विक्री करावी लागत आहे.
धानाचे पीक निघाल्यानंतर अनेक शेतकरी लाखोळी, जवस, हरभरा, गहू व अन्य काही पिकांची लागवड करतात. मात्र, नागभीड तालुक्याचा विचार केला तर तूर, पोपट, लाखोळी आणि काही प्रमाणात जवस या पिकांचेच उत्पादन घेतले जाते. या पिकांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक लाभहोत नसल्याचे दिसून येते.
मागील वर्षीच्या तुलनेत तफावतआता रब्बी हंगाम आटोपला असल्याने शेतकरी हाती आलेला हा कठाण माल अडीअडचण भागविण्यासाठी विक्रीसाठी काढत आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कठाण मालाच्या दरामध्येही फार मोठी तफावत आहे. परिणामी, शेतकरी हा कठाण माल विकू की नको, या विवंचनेत सापडले आहेत.
असे आहेत दरगावखेड्यात कठाण मालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुरीला मागील वर्षी ८ ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल दर होता. हीच तूर यावर्षी ६ ते साडेसहा हजार प्रतिक्विंटल मागितली जात आहे. पोपट मागील वर्षी ७ हजार रुपये क्विंटल विकली गेली. ती पोपट यावर्षी ४ हजार रुपयांवर थांबली आहे. समाधानाची बाब ही की, लाखोळीचे दर स्थिर म्हणजे ४ हजार रुपयेच आहेत. नवीन जवस, हरभरा अद्याप हातात आला नसल्याने जवसाचा दर कळू शकला नाही.
६ ते साडेसहा हजार प्रति क्विंटल दरमागील वर्षी तुरीला आठ ते साडेआठ हजार प्रति क्विंटल असा दर होता. परंतु, यंदा केवळ सहा ते साडे सहा हजार रुपये क्विंटल असा दर आहे.