साता जन्माची साथ ही खरीच ! पतीच्या मृत्यूनंतर तिला नाही सहन झाला विरह; पंधरा तासातच सोडले प्राण
By राजेश भोजेकर | Updated: October 18, 2025 16:47 IST2025-10-18T16:44:26+5:302025-10-18T16:47:17+5:30
Chandrapur : सिंदेवाही तालुक्यातील अंतरगावात हृदयद्रावक घटना

The companionship of seven births is real! After the death of her husband, she could not bear the separation; She passed away within fifteen hours.
चंद्रपूर : पती-पत्नीच्या अतूट नात्याचं आणि अमर प्रेमाचं एक हळवं उदाहरण सिंदेवाही तालुक्यातील अंतरगावात घडले. पंधरा तासांच्या अल्प अवधीत पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. शालीकराम आडकुजी ठिकरे (वय ६५) आणि त्यांची पत्नी सिताबाई शालीकराम ठिकरे (वय ६०) हे दोघेही दोन मुलं, एक मुलगी, सुना आणि नातवंडे यांच्यासह आनंदी आयुष्य जगत होते.
शुक्रवारी दुपारी शालीकराम ठिकरे हे घरात आराम करत असताना अचानक बेशुद्ध पडले. पत्नी सिताबाईंनी आवाज दिला, पण प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी पाहणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पतीच्या निधनाने स्तब्ध झालेल्या सिताबाईंनी विरह सहन न होता दुसऱ्या दिवशी सकाळी प्राण सोडले.
शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास ग्रामस्थ, नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत दोघांचीही प्रेतयात्रा एकत्र काढण्यात आली. दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आले.
अंतरगावात या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, ठिकरे दाम्पत्याचं नातं अखेरच्या क्षणापर्यंत जिवंत राहिल्याचे उदाहरण गावाच्या स्मरणात दीर्घकाळ कोरले जाईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.