सहावीतील मुलीवर नात्यातीलच युवकाचा अत्याचार, राजुरातील धक्कादायक घटना

By राजेश भोजेकर | Updated: April 5, 2023 17:10 IST2023-04-05T17:05:32+5:302023-04-05T17:10:41+5:30

आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी

The 6th class girl raped by a relative youth in bhandara district | सहावीतील मुलीवर नात्यातीलच युवकाचा अत्याचार, राजुरातील धक्कादायक घटना

सहावीतील मुलीवर नात्यातीलच युवकाचा अत्याचार, राजुरातील धक्कादायक घटना

चंद्रपूर : राजुरा शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या ६ वर्गातील मुलीवर जंगलात नेऊन २२ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, राजुरा शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पीडित मुलगी सहाव्या वर्गात शिकत आहे. दिनांक ३ एप्रिल रोजी पीडिता शाळा सुटल्यावर खाऊ घेण्याच्या उद्देशाने बाहेर निघाली असता तिथे मागावर असलेल्या त्या युवकाने तिला बोलावले. युवक पीडितेच्या नात्यातील असल्याने मुलगी त्याच्याकडे गेली. त्यांनतर त्याने घरी पोहचवून देण्याच्या बहाण्याने तिला आपल्या दुचाकीवर बसविले.

इकडे शाळेची बस निघण्याची वेळ होऊनही ती मुलगी न आल्याने बस चालकाने ही माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांना दिली. शाळा प्रशासनाने चौकशी केली असता ती विद्यार्थिनी एका युवकाच्या दुचाकीवर बसुन गेल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी मुलीच्या पालकांना माहिती देऊन मुलीचा शोध घेण्यास सांगितले.

मुलगी परस्पर निघुन गेल्याचे कळताच पालकांनी शोध सुरू केला मात्र पीडिता काही वेळाने घरी परतली. पालकांनी मुलीची चौकशी केली असता नात्यातील त्या २२ वर्षीय युवकाच्या दुचाकीने आपण शाळेतून आल्याचे तिने सांगितले. अधिक माहिती घेतली तेव्हा मुलीने त्या युवकाने आपल्याला जंगलात नेऊन अतिप्रसंग केल्याचे पिडितेने सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच पीडितेच्या आईने रात्री १२ च्या सुमारास राजुरा पोलीस ठाणे गाठून अत्याचाराची तक्रार नोंदविली.

प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी त्या युवकाच्या गावात जाऊन युवकाला अटक केली. वैद्यकीय तपासणीअंती त्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने पोलिसांनी युवकावर भादंवीच्या कलम ३७६, ३७६ अ, ब, ३६३ तसेच बाल लैंगिक अत्याचारांच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्ह्याची नोंद करून न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: The 6th class girl raped by a relative youth in bhandara district