तेंडुलकर ताडोबाच्या प्रेमात ! पाच वर्षात ही आहे सातव्यांदा ताडोबा सफारी; दोन दिवस ताडोबात मुक्कामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 14:58 IST2025-11-22T14:57:08+5:302025-11-22T14:58:56+5:30
Chandrapur : व्याघ्रदर्शनाचा मोह आवरेना, मित्रांसह ताडोबा भेट, स्वतः कार चालवत केले नागपूरहून प्रस्थान

Tendulkar in love with Tadoba! This is the seventh Tadoba safari in five years; Stayed in Tadoba for two days
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : क्रिकेट विश्वातील द ग्रेट सचिन तेंडुलकर शुक्रवारी (दि. २१) पुन्हा एकदा ताडोबाच्या व्याघ्र दर्शनासाठी चिमूर तालुक्यात दाखल झाले. पत्नी अंजली तेंडुलकर आणि मित्रपरिवारासह सकाळी ११ वाजता कोलारा गेट परिसरातील एका खासगी रिसॉर्टमध्ये पोहोचले. तेंडुलकर यांची पाच वर्षांतील ही सातवी वारी असून, आगमनाची माहिती वन विभागाने अत्यंत गोपनीयता बाळगली आहे.
विदर्भात आले की, कुणालाही ताडोबातील व्याघ्रदर्शनाचा मोह आवरत नाहीत. त्यामध्ये क्रिकेटर सचिन तेंडुलकर हे नाव अग्रक्रमावर आहे. दुपारी ३ वाजता सचिन तेंडुलकर यांनी कोलारा गेटमधून शासकीय वाहनातून सफारीसाठी ताडोबा रवाना झाले. वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात त्यांनी मागील भेटीतही अविस्मरणीय अनुभव घेतले होते. यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील उमरेड-पैरोली-करंडला अभयारण्यात त्यांना वाघाचे दर्शन लाभले होते. देश-विदेशातील हजारो पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने प्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रायन लारा, अनिल कुंबळे व अनेक नामांकित नट-नट्यांना भुरळ घातली आहे.
तेंडुलकर, तर ताडोबाच्या प्रेमात आहेत. दोन दिवस ताडोबात मुक्कामी राहणार असल्याची माहिती आहे. कोलारा गेट परिसरात तेंडुलकर यांच्या भेटीमुळे पर्यटकांमध्ये उत्सुकता वाढली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने त्यांच्या सफारीबाबत गोपनीयता पाळली आहे.