Teacher protests | शिक्षकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध
शिक्षकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील विना अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालय तसेच वाढीव तुकड्या यांना अनुदान मिळण्यासाठी विनाअनुदानित शाळा, क.म.वि. व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कृती समितीच्या वतीने न्याय मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनकर्त्यावर अमानुष लाठीहल्ला करून महाराष्ट्र शासनाने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कित्येक शिक्षक, कर्मचारी जखमी झाले. या घटनेचा निषेध म्हणून कृती समितीच्या वतीने विदर्भ माध्यमिक संघ सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. जिल्ह्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक क.म.वि. व वरिष्ठ महाविद्यालय, कॉन्व्हेंट कडकडीत बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत शाळा महाविद्यालय बंद करण्यात आले. सोबतच म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ विभाग नागपूरद्वारा सेंट मायकल चंद्रपूर येथे आयोजित मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण बंद करण्यात आले. या आंदोलनात शिक्षण संस्थाचालक संघ, विनाअनुदानित शाळा कृती समिती, नुटा, विजुक्आ, यंग टिचर्स असोसिएशन, जिल्हा मुख्याध्यापक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती प्रजासत्ताक शिक्षक संघटना, शिक्षक सेना, म. रा. शिक्षक परिषद चंद्रपूर शहर, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना जि. चंद्रपूर या संघटनांनी सक्रीय सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनासाठी प्रा. अनिल शिंदे, प्रा. सुर्यकांत खनके, संध्या गोहोकार, केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, प्रभाकर पारखी, लक्ष्मणराव धोबे, दिगांबर कुरेकार, नरेंद्र बोबडे, अशोक पोफळे आदींनी पुढाकार घेतला होता.


Web Title: Teacher protests
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.