संतापाच्या भरात मारला दगड, नऊ दिवसांनी बनवाबनवी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:26 IST2021-09-13T04:26:32+5:302021-09-13T04:26:32+5:30
कोरपना : पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने राग अनावर होऊन पतीने पत्नीच्या डोक्यावर दगड मारला. यात ती बेशुद्ध ...

संतापाच्या भरात मारला दगड, नऊ दिवसांनी बनवाबनवी उघड
कोरपना : पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने राग अनावर होऊन पतीने पत्नीच्या डोक्यावर दगड मारला. यात ती बेशुद्ध झाली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांना, नंतर पोलिसांनाही कुटुंबीयांनी ती पाय घसरून पडल्याचे सांगितले. दरम्यान, आठ दिवसांनी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवाल संशयास्पद असल्याने पोलिसांनी या दाम्पत्याच्या मुलांना घटनेबाबत विचारणा केली. तेव्हा पतीने पत्नीला दगड मारल्याचे सांगितले.
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील, कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर अतिदुर्गम भागात वसलेले थिपा गाव. येथील संगीताचे तेरा वर्षांपूर्वी अय्या कोडापे यांच्याशी लग्न झाले. सुखी संसाराच्या संसारवेलीवर दोन गोंडस फुलेही उगवली. यातच अय्याचा अकाली मृत्यू झाला. संगीताच्या नशिबी एकाकीपण आले. अशातच तिचे गावातील एका व्यक्तीशी सूत जुळले. यातच तिच्या घरच्या मंडळींनी गणेशशी दुसरे लग्न लावून दिले. लग्नानंतरही तिचे जुन्या प्रियकराशी प्रेमाचे संबंध सुरूच होते. ३० ऑगस्टला घरातच प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत संगीता, पती गणेशला आढळून आली. संतापाच्या भरात त्याने तिच्या डोक्यावर दगड घातला आणि ती बेशुद्ध पडली. गाव दुर्गम भागात असल्याने दळणवळणाच्या सोयीसुविधाअभावी तिला तिच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी कोरपना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी विचारपूस केल्यास, तिच्यासोबत असलेल्या आई-वडील, भाऊ यांनी घरीच पाय घसरून पडल्याचे सांगितले. त्यानंतर तिला प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. तेव्हाही ती बेशुद्धावस्थेत होती. उपचारादरम्यान तिचा ७ सप्टेंबरला मृत्यू झाला. त्यानंतर तिचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाची माहिती कोरपना पोलिसांना देण्यात आली. संशयास्पद असल्याने प्रकरणाची चौकशी कोरपना पोलिसांनी सुरू केली. त्यावेळी घरच्या मंडळीनी घसरून पडल्याचे बयाणात सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तिची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी कल्पना ( ८ ) व मुलाला हकीकत विचारली असता घडलेला सर्व प्रसंग त्यांनी पोलिसांना सांगितला. फरार पतीची गणेश मडावी अशा नावाव्यतिरिक्त कुठल्याच प्रकारची ओळख त्यांना नव्हती. फक्त वडील तेलंगणा सीमेवरील उपाशा नाला येथे एका शेतात सालगडी म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली. तो गावी गेल्याची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी जाधव, संजय शुक्ला, रामा पुष्पपोळ व पोलीस पथकाने यवतमाळ जिल्ह्यातील जामडोह या मूळ गावी जाऊन चौकशी केली. आरोपी हा गणेश मडावी नसून गणेश वरघडे असल्याची माहिती मिळाली. त्याला त्याच्या घरून पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबावरून त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.