गाढविणीच्या दुधाला सोन्याचा भाव! कपभर दुधासाठी मोजावे लागताहेत इतके रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 12:11 PM2023-11-15T12:11:25+5:302023-11-15T12:16:40+5:30

गाढवीचे दूध आरोग्यासाठी गुणकारी असल्याचा दावा

Sindewahikar is paying 100 rupees for a cup of donkey milk! | गाढविणीच्या दुधाला सोन्याचा भाव! कपभर दुधासाठी मोजावे लागताहेत इतके रुपये

गाढविणीच्या दुधाला सोन्याचा भाव! कपभर दुधासाठी मोजावे लागताहेत इतके रुपये

संदीप बांगडे

सिंदेवाही (चंद्रपूर) : शहरातील एका भटक्या जमातीच्या कुटुंबाने ऐन दिवाळीच्या दिवसांत ध्वनिक्षेपक लावून गाढवीचे दूध विकू लागल्याने नागरिकांत चर्चेचा विषय झाला. विशेष म्हणजे, दोन कप दुधासाठी नागरिक १०० रुपये मोजत असल्याचे दिसून येत आहे. गाढवीच्या दुधामुळे सर्दी, खोकला, कफ व दम्याची समस्या दूर होईल, असा दावा दूध विक्रेत्या कुटुंबाने केला आहे.

दूध म्हटले की नागरिकांच्या डोळ्यांसमोर गाय, म्हैस व शेळीचे दूध येते. गाय व म्हशीचे दूध अनेकांना सर्वाधिक प्रिय असते. मात्र, सिंदेवाही शहरात आता पहिल्यांदाच गाढवीच्या दुधाची चर्चा सुरू झाली. गाढवीच्या दुधाची सवय नसली तरी १० हजार रुपये लिटरने विकले जाते, अशी माहिती आहे. गाढवीच्या दुधाने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सर्दी, खोकला व कफ गाढविचे दुध सेवन केल्याने कायमचा बरा होतो. सिंदेवाहीत सकाळी बरेच नागरिक गाढवीचे दुधाचे सेवन करीत आहे. या दुधात दोन प्रकारच्या जडीबुटी टाकून पिण्यास दिले जात आहे. हे दूध सलग तीन दिवस सकाळी घेतल्यास फायदा मिळतो, असा दावा विक्रेता अंकुश पवार यांनी केला आहे.

गाढवीच्या दुधात काय असते ?

गाढवीच्या दुधाचा वापर चीज, चॉकलेट्स व चेडर यांसारख्या विविध उत्पादनांच्या निर्मितीमध्ये केला जातो. त्यात प्रथिने, ओमेगा-६९ फॅटी अमिनो ॲसिड, लॅक्टोज व खनिजे यांचा समावेश असल्याने मानवी दुधासारखे गुणधर्म आहेत. ही समानता गायीच्या दुधाच्या प्रथिनांची ॲलर्जी असलेल्या लहान मुलांसाठी एक संभाव्य पर्याय बनवते, असा दावा आरोग्य विज्ञानाच्या पुस्तकांत केला आहे.

सिंदेवाहीत यापूर्वी कधी गाढव दिसले नाही. अचानक दिवाळीच्या दिवशी सकाळी ध्वनिक्षेपक लावून काही व्यक्ती वॉर्डावार्डांत गाढव घेऊन फिरत आहेत. ते गाढवीचे दूध विकत असून, आरोग्यासाठी गुणकारी आहे, असा दावा करीत आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनानेही याबाबत खात्री केली पाहिजे.

- बापू मोहुरले, नागरिक सिंदेवाही

Web Title: Sindewahikar is paying 100 rupees for a cup of donkey milk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.