लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव (चंद्रपूर): साडेपाच वर्षे शिक्षणासाठी वेळ व 'एमबीबीएस'ला लागणारा पैसा खर्च करण्यापेक्षा मला व्यवसाय करायचा होता, अशी सुसाइड नोट लिहून 'एमबीबीएस'ला प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थ्याने घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. अनुराग अनिल बोरकर (२०) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी सकाळी तो कुटुंबासोबत गोरखपूर येथे शिक्षणासाठी जाणार होता.
अनुराग हा नवरगाव येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरकर यांचा मुलगा असून, कुटुंबात आई-वडील आणि एक बहीण आहे. अभ्यासू असलेल्या अनुरागने ओबीसी कॅटेगरीतून नीट युजी २०२५ या परीक्षेमध्ये १४७५ वा क्रमांक मिळवत 'एमबीबीएस'मध्ये प्रवेश मिळवला होता. गोरखपूर येथे शिक्षणासाठी रवाना होण्याची सर्व तयारी पूर्ण झाली होती.
मंगळवारी सकाळी त्याच्या आईने अनुरागला उठवण्यासाठी दरवाजा ठोठावला असता तो खोलीत नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी त्याच्या खिशातून एक सुसाइड नोट मिळाली. त्यात 'साडेपाच वर्षे वेळ आणि 'एमबीबीएस'ला लागणारा तेवढा पैसा खर्च करण्यापेक्षा मला व्यवसाय करायचा होता, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.
असे लिहिले होते. शवविच्छेदनानंतर अनुरागवर नवरगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.