किडनी पीडितांना कंबोडियात डांबून केले होते पासपोर्ट जप्त; धक्कादायक वास्तव उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:30 IST2026-01-09T14:28:49+5:302026-01-09T14:30:17+5:30
Chandrapur : नागभीड तालुक्यातील रोशन कुळे याच्यासह कंबोडियात गेलेल्या किडनी पीडितांना डॉक्टर कृष्णा व हिमांशू यांनी कंबोडियात डांबून ठेवत त्यांचे पासपोर्ट व व्हिसा जप्त केल्याचे धक्कादायक वास्तव तपासात समोर आले आहे.

Passports of kidney patients detained in Cambodia confiscated; Shocking reality revealed
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील रोशन कुळे याच्यासह कंबोडियात गेलेल्या किडनी पीडितांना डॉक्टर कृष्णा व हिमांशू यांनी कंबोडियात डांबून ठेवत त्यांचे पासपोर्ट व व्हिसा जप्त केल्याचे धक्कादायक वास्तव तपासात समोर आले आहे. किडनी काढून दिल्याशिवाय भारतात परतण्याचा कोणताही पर्याय न ठेवता पीडितांची मानसिक व शारीरिक पिळवणूक करण्यात आली, अशी कबुली पीडितांनी दिली आहे.
रोशन कुळेसह शंकर जयस्वाल (बिहार), मनोज कुमार शेषमा (राजस्थान), सुमित सिंग (हरियाणा) आणि तारीख अहमद यांना हिमांशू व कृष्णा यांच्या माध्यमातून कंबोडियात नेण्यात आले होते. प्रत्येकी आठ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र, कंबोडियात पोहोचल्यानंतर एका किडनीची किंमत सुमारे एक कोटी रुपये असल्याचे समजल्यावर पीडितांनी किडनी विक्रीस नकार दिला. त्यानंतर त्यांचे पासपोर्ट व व्हिसा जप्त करून सर्वांना तेथेच डांबून ठेवण्यात आले. अखेर सुटकेचा कोणताही मार्ग नसल्याने किडनी डोनेट केल्यानंतरच त्यांना मायदेशी परतता आले, असे त्यांनी तपासात सांगितले.
पीडितांचे न्यायालयात बयाण
चंद्रपूर पोलिसांनी तयार केलेल्या यादीतील शंकर जयस्वाल, मनोज कुमार शेषमा, सुमित सिंग आणि तारीख अहमद या चौघांना चंद्रपुरात आणून तपास अधिकारी अमोल काचोरे यांनी त्यांचे बयाण नोंदवले. हिमांशूच्या माध्यमातून कंबोडियात किडनी काढण्यात आल्याची आपबीती त्यांनी न्यायालयासमोर कथन केली.
सहाही सावकारांचे जामीन अर्ज फेटाळले
या प्रकरणात अटकेत असलेल्या ब्रह्मपुरीतील सहा सावकारांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने सर्व जामीन अर्ज फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
डॉक्टर सिंग याचा शोध
दिल्लीतील डॉक्टर सिंग याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले असून, पुढील तपास सुरू आहे.